गोरक्षनाथ गडावरील श्रावणोत्सवाला ब्रेक
सार्वमत

गोरक्षनाथ गडावरील श्रावणोत्सवाला ब्रेक

करोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानचा निर्णय

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोनाच्या पार्श्वभूमीवर गोरक्षनाथ गडावर यंदा श्रावण महिन्यातील उत्सव व भंडारा होणार नाही असा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. भाविकांची गडावर येऊ नये असे आवाहन करतानाच गडाकडे येणारे रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीने दिली.

श्रावण महिना सुरु झाला असून यावर्षी शासनाच्या निर्णयानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे श्री गोरक्षनाथ गडावर संपूर्ण श्रावण महिन्यात दर्शन, मूर्ती पाणी घालणे, पारायण करणे, भंडारा (महाप्रसाद) असे धार्मिक कार्यक्रम यंदा होणार नाहीत. शासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. तसेच गोरक्षनाथ गडावर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत कुणीही भाविकांनी दर्शनाला, भंडार्‍याला येऊ नये असे आवाहन देवस्थानच्यावतीने अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने केले आहे.

नगर जवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर संपूर्ण श्रावण महिन्यात भंडारा होत असतो. हजारो वर्षाची ही परंपरा यावर्षी कोरोना मुळे खंडित करण्यात आली आहे. नवनाथ भक्तिसारमध्ये या ठिकाणाचे महत्व सांगितले आहे. स्त्री राज्यातून परत येताना मच्छिंद्रनाथानी सोन्याची वीट बरोबर आणली होती, ऋषी, मुनी, देवासाठी भंडारा करण्यासाठी ती गोरक्षनाथांनी फेकून दिली.

तेव्हा मच्छिंद्रनाथाचा राग अनावर होऊन त्यांनी तांडव केले. गुरूला शांत करण्यासाठी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला व गुरूची इच्छापूर्तीसाठी सर्वाना निमंत्रण देऊन या ठिकाणी संपूर्ण श्रावण महिन्यात महायन्य करत अन्नदान केले,अशी पौराणिक कथा आहे. म्हणून लोक या ठिकाणी भंडारा करतात.

यावर्षी कोरोना मुळे मांजरसुंभा गावातून गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत कुणीही दर्शनाला,भंडार्‍याला येऊ नये , असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com