अकोलेकरांनी पुकारलेल्या जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद

अकोलेकरांनी पुकारलेल्या जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद

अकोले (प्रतिनिधी) - करोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अकोलेकरांनी पुकारलेल्या जनता कर्फ्युला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. पण शहराबाहेरील लोक काही कामानिमित्ताने शहरात येत असल्याचे चित्र दुपार व सायंकाळच्या वेळी पहावयास मिळाले. विकेंड लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व छोटे मोठे दुकाने बंद होते.

शहरा बाहेरील लोकांना जनता कर्फ्युची कल्पना नसल्याने लोक मोटारसायकलवर अकोलेत येत होते, पण महात्मा फुले चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा ये-जा करणार्‍यांची कसून चौकशी करत होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासह काहींना रॅपिड अँटीजेन चाचणीला सामोरे जावे लागले.

अकोले तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी करोना बाधितांनी हजारचा आकडा गाठला. त्यामुळे धास्तावलेल्या सर्वपक्षीय, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, व्यापारी, प्रशासन यांनी एकत्रित येत अकोले शहरात दि. 15 ते 30 मे पर्यंत कडक जनता कर्फ्युचा निर्णय काल शुक्रवारी घेतला होता. त्यानुसार अकोले नगरपंचायतच्यावतीने शहरातील विविध भागात दवंडी देण्यात आली.

सकाळी दूध घालण्यासाठी शहर व परिसरातील लोक दूध डेअरीवर येत होते. तर सायंकाळचे दूध संकलन कालपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. किराणा मालाची दुकाने, कृषी सेवा केंद्रे बंदमध्ये सहभागी होणार असल्याने शुक्रवारीच लोकांनी आवश्यक किराणा व शेतीपूरक औषधे, खते घेतली होती.

शुक्रवारप्रमाणे काल शनिवारीही मराठी मुलांच्या शाळेत शहर व परिसरातील नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. काल 80 जणांमध्ये 12 जण पॉझिटिव्ह आले होते. त्यातील बहुतांश लोक गुरुवारी बाधित झालेल्या लोकांच्या संपर्कातील असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. कालही मराठी शाळेत 53 लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या. या 53 पैकी 3 पॉझिटिव्ह आढळून आले.

दुपारी 12 वाजेनंतर मराठी मुलींच्या शाळेतील हे आरोग्य खात्याचे पथक महात्मा फुले चौकात गेले. अनावश्यक बिगर कामाचे फिरणार्‍या लोकांच्या येथील महात्मा फुले चौकातील चेक पोस्टवर नगरपंचायतच्या वतीने रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. याठिकाणी 38 लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यातील 2 जण बाधित आढळले. असे दिवसभरात 5 जण पॉझिटिव्ह आढळले. विनाकारण फिरणार्‍यांच्या तपासण्या करण्यात येत असल्यामुळे त्यांचे बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

अकोले नगरपंचायतीचे वतीने शहरात येणारे विविध रस्ते बॅरिगेट टाकून बंद केले होते. त्यामुळे बाहेरून शहरात येणारे लोक सर्व महात्मा फुले चौकात एकत्रित येत असल्याचे दिसले. नगरपंचायत, महसूल, पोलीस प्रशासन मात्र या सर्व लोकांची कडक चौकशी करताना दिसून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com