Good Bye 2021 : गुन्हेगारीइतकेच नेवासा पोलीस ठाणेही चर्चेत

करोनाच्या दुसर्‍या लाटेत साडेचारपट अधिक बाधित; दोन्ही कारखाने व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत प्रस्थापितांचे वर्चस्व
Good Bye 2021 : गुन्हेगारीइतकेच नेवासा पोलीस ठाणेही चर्चेत

नेवासा | Newasa

नेवासा तालुक्यात मावळत्या वर्षात नेवासा पोलीस ठाण्याचा कारभार, करोनाचा उद्रेक तसेच 59 ग्रामपंचायती व दोन साखर कारखान्यांच्या निवडणुका हे विषय चर्चेत राहिले.

नेवासा पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन प्रभारी पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांचा कार्यकाल संपल्यावर विजय करे यांनी पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्विकारला मात्र मोबाईलवरील संभाषण ध्वनीफितीमुळे त्यांना जावे लागले. त्यानंतर 10 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर बदल्यांची कारवाई झाली. एक पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला तर एकावर अपघातातील मयताच्या नातेवाईकांना विमा लाभ मिळण्यासाठी संगनमताने बनावट पंचनामा केल्याचा गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक म्हणून बाजीराव पोवार बदलून आले. वाढत्या गुन्हेगारीपेक्षा पोलीस ठाण्याचा कारभार व अंतर्गत राजकारण याचीच चर्चा अधिक राहिली.

दोन्ही कारखाने बिनविरोध झाले. ग्रामपंचायतीत बहुसंख्य ठिकाणी ना. शंकरराव गडाख गटाने आपले वर्चस्व कायम राखले. विरोधकांनी त्यांच्या ठराविक ग्रामपंचायतींत वर्चस्व राखले. तालुक्यात भाजप अंतर्गत गटबाजी दिसून आली. भाजपाच्या तिघांना पक्षातून निलंबीत करण्यात आले. त्याचबरोबर पक्षाचे नगरपंचायतीतील दोन नगरसेवकही निलंबीत करण्यात आले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वीज बिल प्रश्नी महावितरण कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तशी त्यांच्यावर स्टंटबाजी केल्याची टीकाही झाली.

तालुक्यात करोना बाधितांची संख्या वर्षभरात 13 हजार 764 ने वाढली. 2020 अखेर तालुक्यात 2924 बाधित होते. म्हणजे या वर्षात दुसर्‍या लाटेत साडेचारपट अधिक संख्येने लोकांना बाधित करतानाच जवळपास तिनशे बळी घेतले. या लाटेत शेती व शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. सर्वच शेतीमालाचे भाव पडले. अडीच महिने कांदा मार्केट व बाजार बंद राहिले. प्रतिकूल हवामान व अवकाळी पाऊस ही संकटे यावर्षीही होती. मात्र चांगला पाऊस पडला व धरणे भरली हाच काय तो शेतकर्‍यांना दिलासा ठरला. कृषी कायदे मागे घेण्यासाठी तालुक्यात भारतीय किसान सभेसह काँग्रेस व शेतकरी संघटनांनी आंदोलने केली.

वर्षाच्या शेवटी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची चाहूल लागली. ना. गडाखांकडून विकास कामांची उद्घाटने होऊ लागली तर विरोधकांकडून आंदोलनांना सुरुवात झाली. आता आगामी वर्षात सत्ताधारी व विरोधकांची राजकीय ताकद जनतेला दिसून येईल.

राजकारण

- जानेवारीत पार पडल्या तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या 591 जागांसाठी निवडणुका

- बहुसंख्य ग्रामपंचायती गडाख गटाकडे

- घोडेगावच्या उपसरपंचपदी देसरडा गटाचे यशवंत येळवंडे विजयी

- नेवाशाच्या उपनगराध्यक्षपदी लक्ष्मणराव जगताप विजयी

- माक्याचे सरपंच नाथा घुलेंवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

- ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपाचे चक्काजाम आंदोलन

- भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे यांचेसह अनिल ताके, पोपट जिरे निलंबीत; दोन नगरसेवकही पक्षातून निलंबीत

- खा. संजय राऊत यांचा सोनईत शिवसंवाद तर मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भेंड्यात राष्ट्रवादी परिवार संवादपर्व कार्यक्रम

- कृषीपंप वीज तोडण्याच्या प्रश्नी माजी आमदार मुरकुटे यांचा गळफासाचा प्रयत्न; राजकीय स्टंट असल्याची विरोधकांची टीका

सहकार

- ‘मुळा’ व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध

- ‘ज्ञानेश्वर’च्या अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र घुले तर उपाध्यक्षपदी माजी आमदार पांडुरंग अभंग

- ‘मुळा’च्या अध्यक्षपदी नानासाहेब तुवर तर उपाध्यक्षपदी कडूबाळ कर्डिले.

- जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत नेवासा तालुका सोसायटी मतदारसंघातून जलसंपदामंत्री शंकरराव गडाख यांची बिनविरोध निवड

- ज्ञानेश्वर कारखाना सेक्रेटरीपदी रवींद्र मोटे

- कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी डॉ. शिवाजी शिंदे

- ‘मुळा’ कारखान्याकडून दिवाळीसाठी कामगारांना साडेपंधरा टक्के तर ‘ज्ञानेश्वर’कडून 16 टक्के बोनसचे वाटप

- जीएसटीचा नियमित भरणा केल्याबद्दल ‘ज्ञानेश्वर’ कारखान्याचा सन्मान

कृषी

- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जानेवारीत भेंडा ते कुकाणा ट्रॅक्टर रॅली तर सप्टेंबरमध्ये भेंड्यात भारतीय किसान सभा व काँग्रेसचा रास्तारोको

- ऐन उन्हाळ्यात एप्रिलमध्ये भंडारदरातून पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर बंधारे भरले

- करोनामुळे कांदा मार्केट अडीच महिने बंद; भाव घसरुन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

- जनावरांना घटसर्प व लाळ्या खुरकतची साथ; तालुक्यात 123 जनावरे दगावली

- ऊस एफआरपीत प्रतिटन अवघ्या 50 रुपये वाढीने शेतकरी संघटना संतप्त

- टेलच्या शेतकर्‍यांना सलग दुसर्‍या वर्षी मिळाले पाणी

- विजेच्या लोंबकळलेल्या तारांचा प्रश्न कायम; शॉर्टसर्किटमुळे तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांचे ऊस जळाले

- जायकवाडी जलसिंचन लाभार्थी गावांतील शेतकर्‍यांची ना. गडाख यांनी घेतली भेट; मोटारी बंद होऊ न देण्याची दिली ग्वाही

शिक्षण

- मागील गुणांच्या आधारीत सुत्रानुसार गुणांकन केल्याने नेवासा तालुक्याचा दहावी व बारावीचा निकाल जवळपास 100 टक्के

- जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचा कोरियातील विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार

- त्रिमूर्ती संकुलातील पहिली ते बारावीच्या सर्व वर्गांना सीबीएसई बोर्डाची मान्यता

- त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानला वसतिगृहयुक्त वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यास एप्रिलमध्ये परवानगी सप्टेंबरमध्ये मिळाली अंतिम मंजुरी

- सोनईतील फार्मसी महाविद्यालयात पीएचडी केंद्राला मान्यता

- विनायक नरवडे यांचा आयएएस परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक

- खरवंडीच्या समता शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष व सचिवावर गुन्हा दाखल

- वर्षभरात राज्य व देश पातळीवरील क्रिडा स्पर्धांमध्ये ‘त्रिमूर्ती’ची दैदिप्यमान कामगिरी

- मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी उदयन गडाख

क्राईम

- नेवासा पोलीस ठाण्यात वर्षभरात दखलपात्र गुन्ह्यांच्या संख्येचा आलेख चढताच. जवळपास एक हजार गुन्हे दाखल

- नेवासा पोलीस ठाणे वर्षभर चर्चेत लाच घेताना पोलीस कर्मचारी सोमनाथ कुंढारे जाळ्यात; वर्षभरात तीन पोलीस निरीक्षक; वाळू तस्कराशी अधिकार्‍याच्या भ्रमणध्वनीवरील संभाषणाची ध्वनीफीत व्हायरल

- पत्नीस जिवंत जाळले; कांगोणीतील पतीस जन्मठेप

- वादग्रस्त गाळ्याच्या मालकीवरुन नेवाशात दोन गटात बाचाबाची; दोन्ही बाजूच्या प्रत्येकी पाच जणांवर गुन्हा दाखल

- कारेगाव येथे दोघा तरुणांकडून वडिलांची हत्या

- उसात लपवलेला 57 लाख रुपये किंमतीचा गांजा सोनई, शिंगणापूर व पाथर्डी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जप्त; चांद्यातील आरोपींना अटक

- उत्पादन शुल्कच्या कारवाईत देशी दारु दुकानांमधून भेसळीचा रात्रीचा उद्योग उजेडात

दखल

- शनैश्वर देवस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी जी. के. दरंदले; नितीन शेटे उपाध्यक्ष

- एप्रिलमध्ये तालुक्यात करोनाचा सर्वदूर फैलाव; मे मध्ये तालुक्यात दररोजच्या बाधितांची संख्या 200 च्या पुढे; बळींची संख्याही मोठी

- करोनामुळे यात्रा-उत्सव बंद; वरखेड येथे आषाढ महिन्यात देवीच्या दर्शनासाठी 20 हजाराची गर्दी; पोलिसांकडून देवस्थान विश्वस्त व ग्रामपंचायत पदाधिकारी अशा 24 जणांवर गुन्हा दाखल

- तालुक्यात शिंगणापूर, चांद्यासह चार कोविड उपचार केंद्र सुुरु; लॉकडाऊन; जिल्ह्याच्या सीमा बंद

- नेवाशातील प्रमुख रस्त्यांसाठी ना. गडाखांनी केली 100 कोटीच्या निधी उपलब्धतेची घोषणा

- पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतला स्मार्ट ग्राम पुरस्कार

- सोनईच्या एकाचा म्युकरमायकोसिसने मृत्यू

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com