Good Bye 2021 : श्रेयवादात कोपरगावाचा विकास थांबला

कोपरगाव तालुक्यात करोनाचे 229 बळी, गोमांसाचा मोठा साठा जप्त || आ.काळे साईसंस्थानचे अध्यक्ष || विवेक कोल्हे कोईमतूर ऊस संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष
Good Bye 2021 : श्रेयवादात कोपरगावाचा विकास थांबला

कोपरगाव |नानासाहेब शेळके| Kopargav

कोपरगाव तालुक्यात मावळते वर्ष अनेक कारणांनी गाजले. गत वर्षाच्या सुरवातील करोना संकटाचा सामना तालुक्याने एकजुटीने केला. करोनाला परतावुन लावण्यासाठी तालुक्यातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, व्यापारी महासंघ, मुंबादेवी तरूण मंडळाने करोना काळात जेवणाचे डबे पुरवत गरजुनां मदतीचा हात दिला. तालुक्याचे नेते आमदार आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, विवेक कोल्हे, नितीन औताडे यांनी कोवीड सेंटर सुरू करून नागरिकांच्या अडचणी दूर केल्या.

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या कणखर भूमिकेमुळे पालिका प्रशासनाला चांगले काम करता आले. दोन्ही नेत्यांच्या पाठपुराव्यातून कोपरगावला उपजिल्हा रूग्णालय मिळाले. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी रिक्षा चालकांना किरणा घर पोहच केला. करोना काळात तालुक्यात 2 लाख 43 हजार 142 नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 15 हजार 106 नागरीक करोना बाधित आढळले. 229 रूग्णांचा करोनाने मृत्यू झाला.

पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. वेळेत आवर्तने न मिळाल्याने उभी पिके शेतात जळून गेली. दरम्यान वरूणराजाने तालुक्यात जोरदार हजेरी लावली. ओढे-नाले एक झाल्याने बळीराजाचा हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामे झाले मात्र नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नाही.

पालिकेची मंजुर विकासकामे राजकारणाच्या कचाट्यात सापडली. श्रेयवादाची ही लढाई औरंगाबादच्या कोर्टात गेली. शहराचा विकास न्यायालयाने थांबविला. दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप झाल्यांनतर निवडणुकीच्या तोंडवर कोर्टातील याचिका मागे घेत सत्ताधारी व विरोधकांनी एकाच बाकावर बसून त्या 28 कामांना संमत्ती दिली.

ऐन महाशिवारात्रीच्या दिवशी पोलिसांनी गोमांसाचा सर्वात मोठा साठा कोपरगावात जप्त केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शहरातील संजयनगर भागात मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या उघडकीला आल्या. त्यामुळे हिदुत्ववादी संघटनांनी कोपरगाव बंद करून तहसिलवर मोर्चा नेला. त्यानंतर प्रशासनाकडून संजयनगर भागातील सर्व अवैध कत्तलखाने उखडून टाकण्यात आले. तालुका वासियांसाठी आनंदाची बातमी वर्षाअखेरीस मिळाली. आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर युवा नेते विवेक कोल्हे यांची कोईमतुर ऊस संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.

राजकारण

- कोपरगावच्या विकास कामांना न्यायालयातून स्थगिती, महाराष्ट्रातील पहिलीच घटना

- कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढिच्या निषेधार्थ गांधीगिरी

- कोपरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कोल्हे गटाचे अरिफ कुरेशी यांची बिनविरोध निवड

- कामगारांना 12 टक्के वेतनवाढ जाहीर करून प्रत्यक्षात वेतनवाढ अदा करणारे कर्मवीर शंकरराव काळे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे दोन्ही कारखाने राज्यात पहिले

- नगरपरिषदेने जागा दिल्यास आदिवासी भवन व एकलव्य पुतळा निधी उपलब्ध करून देऊ - आ.आशुतोष काळे

- कोईमतुर उस संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी विवेक कोल्हेंची निवड

- साईबाबा संस्थानच्या नूतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास कारभार पाहण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी.

सहकार

- आरएल स्टील कंपनी ठरली कोपरगावकरांना जीवदान. करोना काळात मिळाले दररोज 250 ऑक्सिजन सिलेंडर.

- सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्याचे इतिहासात प्रथमच 8 लाख मे.टन सर्वाधिक गाळप

- सहकारी तत्वावर उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मीती करणारा सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखाना पहिला ठरला

- संजीवनीचा पॅरासिटामोल औषध प्रकल्प वर्षभरात मार्गी लागणार

- कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे आधुनिकीकरणाच्या कामाचे भूमिपूजन स्पर्धेच्या युगात काळानुरूप बदल स्विकारने गरजेचे कारखान्याची गाळप क्षमता वाढणार

- सोर्टेड सीमेन अत्यल्प दरात उपलब्ध करुन देण्याचा गोदावरी दूध संघाचा निर्णय

कृषी

- कुंभारीत शेतकर्‍याच्या गायीला मिळाली 1 लाख 161 हजारांची किंमत. ढोलताशाच्या गजरात काढली गायीची मिरवणूक

- गोदावरी कालवे दुरूस्तीसाठी 80 कोटी उपलब्ध करून गोदावरी कालवे दुरुस्तीचा प्रश्न काही अशी मार्गी

- नामको कालवा खोपडीच्या प्रकल्पबाधितांना 2 कोटी 17 लाख भरपाई गोदावरी कालव्यांना रब्बी व उन्हाळ पाच आवर्तने देण्याचा निर्णय.शेतकर्‍यांना पिक नियोजन करणे सुलभ.

- शेतकर्‍यांसाठी उपयुक्त असलेल्या इफको नॅनो युरिया विक्रीचा कोपरगावात शुभारंभ

- दुधाला हमीभाव 32 रुपये देण्याची खासदार सदाशिव लोखंडे यांची लोकसभेत मागणी संपूर्ण कर्ज, विज बिल माफीसह विविध मागण्यांसाठी भाजपाचे कोपरगावात आंदोलन

- कोपरगावात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उदघाटन

शिक्षण

- संजीवनी पॉलीटेक्निकच्या 500 हून अधिक विद्यार्थ्यांची नोकरीसाठीे निवड

- गौतम पोलिटेकनिक च्या विद्यार्थ्यांची बजाज ऑटो मध्ये निवड

- सौ.सुशिलामाई काळे महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये 18 विद्यार्थ्यांची निवड

- संजीवनी सिनिअर कॉलेजला 6 नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

- आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांना 5 कोटी 5 लाख 44 हजारांची शिष्यवृत्ती

- पोहेगावात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास शासन मान्यता

- आत्मा मालिकमध्ये साईच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी खेळाडूंची भरती

- प्रा. विजय शेटे यांच्या श्रीगणेश शैक्षणिक संकुलाकडून करोना काळात भुकेलेल्यांसाठी दररोज 500 जेवणाच्या डब्यांची सोय

- संजीवनीच्या संकेतची कॅनडा विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड

क्राईम

- तालुक्यातील करंजी येथे आठवीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीचा नराधम बापानेच केला विनयभंग

- कोपरगाव पोलिसांनी पकडली 30 लाख रुपये किमतीची 60 किलो बेहिशोबी चांदीे

- कत्तलीसाठी आणलेली 2 लाख 36 हजार रुपये किमतीची 20 जनावरांची सुटका

- उपमुख्याधिकारी मारहाण व पालिका तोडफोड केल्या प्रकरणी ; माजी उपनगराध्यक्ष ,नगरसेवकासह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

- काकडी ग्रामपंचायतीची शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे करापोटी सुमारे साडेपाच कोटी रुपयाची थकबाकी

- मूरर्शतपूर येथील मंडपी नाल्यात बुडून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू

- अपहरण करून खून केला व प्रेत जंगलात फेकले; कासली येथील घटना; सहा आरोपी गजाआड.

- वाळूतस्कर व तलाठी यांच्या मोबाईल संभाषणाची तालुक्यात जोरदार चर्चा

- पोलिस बंदोबस्तात संजयनगर भागातील कत्तलखाने जमिनदोस्त

दखल

- गौतम बँकेस राष्ट्रीय पातळीवरील बँको ब्लू रिबन पुरस्कार प्रदान

- निळवंडेच्या कालव्यांना 190 कोटींची तरतूद

- ज्योती सहकारी पतसंस्थेचा 364 कोटींचा एकत्रीत व्यवसाय

- कोपरगावात 1.53 कोटीच्या ऑक्सिजन प्लँटचे काम पुर्ण

- बिबट्याचा प्राणघातक हल्ला. मुलाने प्रसंगावधान दाखवत वाचविले वडीलांचे प्राण; धामोरी येथील घटना

- कर्मवीर काळे व सहकामहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याला केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून आर्थिक शिस्तीचे प्रशिस्तीपत्रक

- कोपरगाव पिपल्स बँकेस तिन कोटी सत्तावन्न लाख रूपयांचा नफा

- कोपरगावला उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य विभागाची मंजुरी

- कोपरगावची लेक लेक भाग्यश्री वाल्डे हिची बँक ऑफ अमेरिका वॉशिंग्टन येथे सिनीयर टेक असोसिएट अंडर सॉफटवेअर डेव्हलपर म्हणून निवड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com