Good Bye 2021 : करोना, अतिवृष्टी अन् अग्नी तांडव

नैसर्गिक आपत्ती सोबत कोविड विषाणूचा वर्षभर संसर्ग
Good Bye 2021 : करोना, अतिवृष्टी अन् अग्नी तांडव

अहमदनगर | ज्ञानेश दुधाडे| सचिन दसपुते

सरते वर्षे हे नगरच्या जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, महापालिका यंत्रणा, कृषी विभागाला अडचणीचे गेले. या काळात अनेक आव्हाने या सर्व यंत्रणासमोर उभ्या होत्या. मार्च महिन्यात आलेल्या कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेचे तीन तेराच झाल्याचे दिसले. शासकीय आरोग्य यंत्रणेसह खासगी यंत्रणेवर देखील मोठा ताण असल्याचे सर्वांनी अनुभवले. नगरच्या अमरधाम स्मशान भूमीत करोना मृतांवर उपचार करण्यासाठी जागा कमी पडत असल्याचे त्यावेळचे भयावह वास्तव नगरकरांनी अनुभवले. त्यानंतर लसीकरणासाठी नागरिकांची उडालेली झुंबडही अनुभवली.

त्याच नगर तालुक्यासह दक्षिणेतील शेवगाव, पाथर्डी याह अन्य काही तालुक्यांत अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. या परिस्थितीतून बाहेर पडत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून त्याठिकाणी मदत पोहचवण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. मदतीचा प्रस्ताव तयार करून आलेली मदत गरजवंतापर्यंत पोहचवण्याचे काम प्रशासनाला करावे लागले. दरम्यान, नगर शहरातील शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड आणि माजी खासदार दिलीप गांधी या दोन्ही बड्या हिंदूत्वादी नेत्यांचे करोनात निधनामुळे शहरात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली. दुसरीकडे राज्याला हादरून टाकणार्‍या रेखा जरे हत्याकांड आणि त्यानंतर हा खून करणार्‍या आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या प्रकरणामुळे नगरचे नाव राज्याच्या प्रसार माध्यमामध्ये गाजले.

महापालिकेत सत्तांतर होऊन राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे शिवसेनेची सत्ता आली. मात्र, याठिकाणी राष्ट्रवादी कधीच शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसली नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत याचा प्रत्यय नगरकरांना पुन्हा आला. यात महाविकास आघाडीच्या उमदेवाराचा पराभव होवून भाजपच्या उमदेवार निवडून आला.

दिवाळी दरम्यान घडलेल्या जिल्हा रुग्णालयातील अग्नि तांडवात 14 निष्पाप लोकांचा जीव गेला. या प्रकरणात चार डॉक्टरांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या अग्नी तांडावानंतर विभागीय आयुक्तांनी प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आरोग्य मंत्र्यांना सादर केलेला आहे. मात्र, सरकार अथवा आरोग्य मंत्र्यांनी याप्रकरणी कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही. या घटनेनंतर आजही नगरच्या जिल्हा सामान्य हॉस्पिटलमध्ये आयसीयू सुरू नाही. गरीब, गरजवंतांना खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे. सामान्य कुटुंबातील महिलांना प्रसृतीसाठी खासगी हॉस्पिटलचे उंबरे झिजवावे लागत आहेत. यामुळे जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.

क्राईम

- राज्यभर गाजलेल्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पोलिसांनी 102 दिवसांनंतर हैद्राबाद येथे जेरबंद केले. त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

- अहमदनगर शहर सहकारी बँक अपहार प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. तसेच अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण प्रकरण गाजले. अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील अपहारप्रकरणी पुणे पोलिसांनी काही संचालकांना अटक केली. तसेच परळी अर्बन, रावसाहेब पटवर्धन फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

- केडगाव बायपास येथील बायोडिझेल कारवाई प्रकरणी शिवसेनेचा शहरप्रमुख दिलीप सातपुते याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच त्याला शहरप्रमुख पदावरून हटविले. शिवसेनेचे नगर तालुक्यातील नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य गोंविद मोकाटे विरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.

- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील जवळे येथे ऑक्टोबर 2021 मध्ये घडली. याप्रकरणी तब्बल दोन महिन्यांनंतर दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

- जिल्हा पोलीस अधीक्षक पदी मनोज पाटील रूजू झाल्यानंतर त्यांनी वर्षभरात सुमारे 15 टोळ्यांविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. याशिवाय शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे गुन्हेगारांचे हिस्ट्री रजिस्टर तयार केले. दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांसाठी ‘टू प्लस’ योजना आणली.

- कर्जत तालुक्यातील राशिन येथील डॉक्टर महेंद्र थोरात यांच्यासह पत्नी वर्षा, दोन मुलांनी आत्महत्या केली. वर्षभरात विविध कारणांतून अनेक युवक, विवाहिता, पुरूषांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.

- करोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर जिल्ह्यात चोर्‍या, घरफोड्या, दरोडे, रस्तालूट यासह खून, खुनाचा प्रयत्न हाणामारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे पोलीस यंत्रणेवरचा ताण अधिक वाढला.

महानगर पालिका

- महापालिकेत सत्तांतर होऊन राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे शिवसेनेची सत्ता आली. मात्र, याठिकाणी राष्ट्रवादी कधीच शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसली नाही.

- अमृत पाणी योजनेला गती मिळाली असून 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. नगर शहरातील स्वच्छतेत महापालिकेला ‘थ्री स्टार’ मानांकन मिळाले.

- ई-स्मार्ट प्रकल्प कार्यन्वित करून नगरमध्ये पथदिवे बसविण्यास सुरूवात.

- मनपा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय

सहकार

- जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी चूरसपूर्ण निवडणूक

- करोनामुळे सहकारी सोसायट्या आणि अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.

- 11 जिल्हे आणि दोन राज्यांत कार्यरत असणार्‍या नगर अर्बन बँकेची निवडणूक सहकार विभागाने घेतली. या निवडणुकीसाठी 56 हजार मतदार होते.

- बाजार समित्या निवडणूक प्रक्रियेत 31 सप्टेंबरनंतरचे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकांना मतदानाचा हक्क नसल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या.

- कोविडमुळे 3 हजारांहून अधिक सोसायट्यांच्या निवडणुका रखडल्या असल्याने आठवड्याला सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सहकार विभाग सध्या राबवत आहे.

- चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी मंडळाने विरोधी गटाचा पराभव करत आपले वर्चस्व राखले.

- सहकार खात्याने पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, नगर, जामखेड तालुक्यात खासगी सावकारांवर छापे टाकून कर्जदारांची सुटका केली.

- खासगी सावकारांकडून मोठ्या संख्येने शेतकर्‍यांच्या जमिनी सोडवून परत केल्या.

जिल्हा परिषद

- करोनामुळे जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, कांतिलाल घोडके, अनिल कराळे, निमंत्रित सदस्य मोहनराव पालवे यांचे या वर्षभरात निधन झाले. याशिवाय शिक्षण विभागातील 48, आरोग्य 8, सामान्य प्रशासन 4, ग्रामपंचायत 3, सार्वजनिक बांधकाम 2, पशुसंवर्धन 2, महिला व बालकल्याण 2, अशा एकूण 69 जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचा करोनामुळे मृत्यू झाला.

- थंडीमुळे मृत पावलेल्या शेळ्या आणि मेंढ्यांच्या मालक शेतकरी, पशुपालकांना मदत देण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय

- उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींना शिष्यवृत्तीच्या धर्तीवर मदत करण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय

- विधान परिषदेची निवडणूक डिसेंबर 2021 मध्ये होणार होती. त्यामुळे विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना मतदान करण्याचा योग येणार होता. त्यादृष्टीने अनेक इच्छुक उमेदवारांनी या मतदारांकडे दिवाळी फराळही पोहोच केले. परंतु ऐनवेळी ही निवडणूक पुढे ढकलली व या वर्षात विधान परिषदेला मतदान करण्याचे सदस्यांचे स्वप्न भंगले.

- वर्षभरात जिल्हा परिषदेत काही अधिकारी बदलून गेले, तर त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी पुण्याहून संभाजी लांगोरे बदलून आले. याशिवाय उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, संजय कदम, परीक्षित यादव, पशुसंवर्धन अधिकारी सुनील तुंभारे, कृषी विकास अधिकारी सुनील राठी आदींची बदली झाली. तर संदीप कोहिनकर, मनोज ससे, शंकर किरवे, धनंजय आंधळे, राजू लाकूडझोडे, पांडुरंग गायसमुद्रे, सुरेश शिंदे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, भास्कर पाटील हे अधिकारी बदलून आले.

- करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात दीड कोटी रुपये खर्चून अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप करण्याचे ठरले, परंतु गोळ्या खरेदीची लांबलेली प्रक्रिया, त्यानंतर शेवगावमध्ये निकृष्ट गोळ्यांचा आढळलेला प्रकार यामुळे यात घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांकडून झाला. पुढे पंचायत समिती, ग्रामपंचायतीकडून प्रत्यक्ष गोळ्या वाटप होण्यासाठी बराच उशीर झाला. करोनाचा काळ संपत आला असताना एवढ्या उशिरा गोळ्या वाटप करून काय साध्य होणार? असे प्रश्न उपस्थित झाले. कालांतराने या सर्व गोळ्या वाटल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला, परंतु मार्च 2021 मध्ये आलेली करोनाची दुसरी लाट या गोळ्या रोखू शकली नाही.

शिक्षण

- राज्यात सर्वात आधी शाळा उघडल्या...

- करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर नगर जिल्ह्यात प्राथमिकसह माध्यमिक शाळा उघडण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समितीत घेण्यात आला. त्यानुसार 14 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या. त्यानंतर डिसेंबरपासून इतर राज्यांत शाळा उघडल्या. दोन वर्षे ऑनलाईन अभ्यासक्रमाला कंटाळलेले विद्यार्थी त्यामुळे काहीसे सुखावले.

- जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले.

- शालेय पोषण आहार योजनेतील तांदूळाचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला.

- रोजगार हमी योजनेतून प्राथमिक शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय.

- शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घसरला.

महसूल

- जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेंद्र भोसले यांची बदली.

- करोना आणि अतिवृष्टीच्या संकटामुळे महसूल यंत्रणेसमोर आव्हान

- अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना पंतप्रधान गरिब कल्याण योजनेतून 31 लाख नागरिकांना मिळाले वर्षभर मोफत धान्य.

- करोना मुक्तीच्या हिवरेबाजार पॅटर्नबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे

- जिल्ह्यात सप्तपदी अभियान यशस्वीपणे राबवित शेतात जाण्यासाठी वादात अडकलेले 300 हून अधिक रस्त्यांच्या श्वास मोकळा केला.

- पीएम किसान सन्मान योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याहस्ते जिल्हाधिकार्‍यांचा गौररव

- 29 शिवभोजन केंद्रा मार्फत लाखो बेघर, गरजुंना मोफत जेवण उपलब्ध करून दिले.

- मार्च महिन्यांत करोनामुळे शाळा आणि बाजार समित्या बंद करण्याचा कठोर निर्णय

- ई-पीक पाहणीमुळे तलाठ्यांना शेतात जाऊन पाहणी करण्याचे परिश्रम वाचले.

- जिल्ह्यातील 11 लाख 72 हजार खातेदारांपैकी 10 लाख 28 हजार खातेदारांना डिजीटल सातबारा वाटप

- चक्रीवादळ, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनामार्फत 28 कोटींची मदत मिळवून दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com