श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सध्या श्रीरामपूर शहरात सर्वत्रच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नगर पालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

गोंधवणीरोड हा परिसर अत्यंत गजबजलेला परीसर असून मोठी लोकवस्ती याठिकाणी आहे, मात्र गोंधवणीरोड पाटाच्या पुलाखाली नेहमीच काही कोंबडी (चिकन) मटन विक्रेते कोंबड्यांची पंख आणि इतर घाण याठिकाणी मुद्दामहून आणून टाकतात. यामुळे याठिकाणी मोकाट कुत्र्यांचा मोठा वावर अधिक प्रमाणात असतो, रस्त्याने ये-जा करणार्या नागरिकांना, शालेय विद्यार्थी तथा लहान बालकांच्या अंगावर येथील मोकाट कुत्रे धाऊन जात, कधी चावाही घेत आहेत, तसेच शहरातील काही नागरिक आपली मेलेली जनावरे शेळी, मेंढी, कुत्रे याठिकाणीच आणून टाकतात.

मात्र या पुलाखाली पुर्वीच साचलेले घाण पाणी असल्याने त्यात सदरील मेलेली जनावरे अक्षरश: सडून परिसरात प्रचंड प्रमाणात नेहमीच दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा भयानक प्रश्न निर्माण होतो आहे, हे सर्व अवगत असताना देखील संबंधित नगर पालिका प्रशासन स्वच्छता विभाग (ठेकेदार) असूनी डोळे, पण आंधळे अशी सातत्यानेच भूमिका बजावत असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव मोठ्या प्रमाणात या दुर्गंधीच्या त्रासाचा सामना करणे भाग पडत आहे.

शहरातील अस्वच्छतेबाबत जे. जे. फाऊंडेशनने नगर पालिका प्रशासनास अनेकवेळा कळवूनही आणि उपोषणे करूनही केवळ खोटी आश्वासने व्यतिरिक्त काहीच उपयोग होत नाही आणि कोणीच दखल घेत नाही अशा भयानक अवस्थेतून या परीसरातील नागरिकांना नेहमीच या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे, चक्क उघड्यावर पडलेली मेलेली जनावरे नगर पालिकेच्या स्वच्छता विभागास (ठेकेदार) कर्मचार्यांना न दिसावी यापेक्षा शहरवासियांचं दुर्दैव ते काय? असे म्हटल्यास वावगे ठरुच शकत नाही.

कारण या स्वच्छता (ठेकेदार) कर्मचार्यावर नगर पालिका प्रशासनाचा जरासा देखील वचक असावा असे काहीच दिसून येईनासे झाले आहे, मात्र आता याविरुद्ध जे.जे.फाऊंडेशन झोपी गेलेल्या नगर पालिका प्रशासनास जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार असल्याचे जे.जे. फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,

आता तरी श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि नागरिकांना त्रासापासून मुक्त करावे अन्यथा शहरातील नागरिकांना स्वच्छता ठेकेदाराच्या भरवशावर सोडणार्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळू पाहणार्या नगर पालिका प्रशासन तथा विद्यमान नगर पालिका लोकप्रतिनिधींना येत्या नगर पालिकेच्या निवडणुकीत याची मोठी किंमत चुकती करावी लागेल, असेही या पत्रकात म्हटले आहे.

या पत्रकावर जे. जे. फाउंडेशनचे जोएफ जमादार, असिफ तांबोळी, गुड्डू जमादार, अल्तमश शेख, अरबाज कुरैशी, जकरिया सैय्यद, मुबसशीर पठाण, अनवर तांबोळी, दानिश पठाण, शादाब पठाण, नईम बागवान, शाहिद शेख, फरहान शेख आदींच्या सह्या आहेत.