
गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav
श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक कुत्रे, शेळ्या व गायी फस्त झाल्या आहेत. वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी गोंडेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याने अनेक वर्दळीच्या ठिकाणी, गोठ्यात जाऊन अनेक शेळ्या, वासरे, कुत्रे फस्त करण्याचा धडाका लावला आहे. या दहशतीमुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. एक बिबट्या व दोन बछडे असा तीन जणांचा कळप असल्याने चक्क दिवसा बिबट्याचे दर्शन अनेक नागरिकांना घडत आहे. वाड्या वस्त्यावरून येणारे शालेय मुले अक्षरशः घाबरलेले आहेत.
काही दिवसांपूर्वी नारायणराव पिंजारी यांच्या शेळीवर हल्ला झाला होता. चितळीरोड भागातील आमले यांच्या गायीवर हल्ला केला होता तर या भागातील अनेक कुत्रे फस्त केले आहेत. जळगावरोड कडील अनेक कुत्रे गायब झाले आहेत. बाळासाहेब जगताप यांच्या मका पिकामध्ये नागरिकांनी फटाके वाजवून बिबट्याला तेथून काढून दिले होते. आता गोंडेगाव-नायगाव शिवारात काल रात्रीच्या वेळी शेतकरी गणेश बडाख व राजेंद्र कदम हे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यांनी बिबट्या पाहील्याने त्यांनी फटाके वाजविले. त्यानंतर तो तेथून दुसर्या शेतात निघून गेला.
या परिसरातील अनेक शेतकरी वाडीवस्तीवर राहतात. त्यामुळे अनेक शेतकर्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकर्यांनी गायीसाठी गोठ्याला तार कपाउंड केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात जनावरांचे संरक्षण झाले आहे. या भागात दिड दोन महिन्यांपासून धुमाकुळ घालणार्या बिबट्या व दोन बछड्यांचा वन विभागाने कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थ करीत आहेत.