गोंडेगाव-जळगाव रस्त्यासाठी 15 ऑगस्ट रोजी आंदोलन

ग्रामस्थांचा इशारा || रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता समजणे अवघड
गोंडेगाव-जळगाव रस्त्यासाठी 15 ऑगस्ट रोजी आंदोलन

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव ते जळगाव दोन्ही गावांना जोडणार्‍या रस्त्याची गोंडेगाव हद्दीत दयनीय स्थिती निर्माण झालेली आहे. हा रस्ता पूर्णपणे फुटलेला असून पावसाच्या पाण्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजणे अवघड झाले आहे. या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. या रस्त्यावरून नागरिकांना पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. दुचाकी व सायकली चिखलामुळे दररोज घसरून पडताना दिसत आहे. चारचाकी वाहने तर जाणे शक्यच होत नसल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे. अनेकवेळा प्रयत्न करुनही या रस्त्याची कामे करण्यात आली नाही. म्हणून दि. 15 ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या रस्त्यावर गोंडेगाव हद्दीत गावापासून 1 ते 2 किमी. अंतरात थोरात, जगताप, म्हैस, टिळेकर, चव्हाण, फोपसे, चौरे यांच्या वस्ती असून शंभर ते दिडशे घरे आहेत. याठिकाणी अंदाजे 400 - 500 लोकसंख्या असणारी लोकवस्ती आहे. सर्व नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, यांना दूध उत्पादक शेतकरी तसेच लहान विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी चिखलातून व साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून रस्ता शोधत कसरत करावी लागते. काही लहान-मोठे अपघात घडत असतात. पर्यायी रस्ता म्हणून गावात येण्यासाठी काही नागरिकांना चांगदेवनगर किंवा चितळीवरून यावे लागत आहे.

जास्त प्रमाणात पाऊस झाला तर रेल्वेच्या बोगद्यात देखील जास्त पाणी साचले तर बंद पडतो. त्यामुळे दोन्ही बाजुने रस्ता बंद होत असतो. जर आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाली किंवा अचानक दुर्दैवाने एखादी घटना घडली तर कुठलीही गाडी रुग्णवाहिका देखील येऊ शकणार नाही, अशी या रस्त्याची अवस्था आहे, तसेच शेतातला माल व भाजीपाला बाजारात घेऊन जाता-येत नाही त्यामुळे गरीब शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

सरला बेट, गोवर्धन, नाऊर, नायगाव, जाफ्राबाद, यांना जळगाव, वाकडी, गणेशनगर, राहाता शिर्डी येथे जाण्या-येण्यासाठी या रस्ता जवळचा मार्ग असून परिसरातील अनेक कामगार गणेशनगर साखर कारखान्यात कामाला असून या सर्व कामगारांना विनाकारण लांबच्या मार्गाने जावे लागत असून वेळेचा आणि आर्थिक अपव्यय होत असतो.

गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे काम केले गेले नाही. 4-5 वर्षांतून तात्पुरता मुरूम टाकून मलमपट्टी केली जाते. लोकप्रतिनिधी लक्ष घालत नाहीत. आमदार व खासदार हे बाहेरचे असल्यामुळे ते लक्ष घालत नाहीत व काम होत नाही अशी या भागातील नागरिकांची भावना निर्माण होत आहे. आता या भागातील नागरिकांच्या डोक्यावरून पाणी चालले असल्याचे विजय सीताराम थोरात यांनी सांगितले. गावातील सर्वांनी एकजूट करून आंदोलन केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

यासाठी आम्ही एकत्र येऊन 15 ऑगस्टला मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा विजय सिताराम थोरात, शिवाजी सिताराम थोरात, मछिंद्र चव्हाण, भारत चव्हाण, आबासाहेब थोरात, संतोष सूर्यभान म्हैस, गोरख लक्ष्मण म्हैस, ताराचंद लक्ष्मण म्हैस, गोरख टिळेकर, राहुल राजेंद्र म्हैस, विठ्ठल म्हैस, सचिन म्हैस, संतोष किसन म्हैस,दत्तात्रय म्हैस, दत्तात्रय निपटे, एकनाथ तळेकर, सचिन सोपान म्हैस, प्रमोद जगताप, प्रदीप जगताप, बाळासाहेब जगताप, संजय जगताप, दिलीप जगताप, गणेश अशोक जगताप, विजय फोपसे तसेच पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉ. रमेश चौधरी, डॉ. रवींद्र लहारे, डॉ. किरण बडाख, डॉ. अभिजित चित्रक, शंकर गलांडे आदी ग्रामस्थांनी दिला आहे.

एका वर्षा पूर्वी हा रस्ता वाहतुकीस किमान नागरिकांना दळण वळण करता येत होते परंतु मातुलठाण लिलाव व चोरटी वाळूच्या साधनांमुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने आता या रस्त्यावरुन नागरिकांना दळण वळण करणे फार कठीण होत आहे. त्यांमुळे आम्ही सर्व आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

- सागर बढे, सरपंच, गोंडेगांव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com