गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकरला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

अर्बन बँक बनावट सोनेतारण प्रकरण
गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकरला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण प्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोल्ड व्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर (रा. शेवगाव) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. त्याला शनिवारी तपासी अधिकारी ए. आर. आव्हाड यांनी पाथर्डी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकणी गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकरसह 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल वासुमल आहुजा यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनावट सोने तारण ठेवून बँकेची सुमारे पाच कोटी 30 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. मुख्य आरोपी दहिवाळकर याला अटक केल्याने आता पोलीस तपासात कोणाकोणाची नावे समोर येतील याकडेच अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान दहिवाळकर याला अटक केल्याने तपासाला गती येणार आहे. 2017 ते 2021 या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर व कर्जदारांनी संगनमत करून बनावट दागिने खरे असल्याचे भासवून मूल्यांकन दाखले देऊन बँकेकडून कर्ज घेतले. कर्जदारांना वेळोवेळी नोटिसा देऊनही त्यांनी तारण ठेवलेले सोने सोडून घेतले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नगर येथे बँकेच्या मुख्य शाखेत या सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र त्यातील सोने बनावट असल्याचे समोर आले होते. त्यामुळे बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर याच्यासह 159 कर्जदारांवर बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com