दहा लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लॉन्ड्री चालकाकडून परत

प्रामाणिकपणाबद्दल लॉन्ड्री चालकावर कौतुकाचा वर्ष
दहा लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लॉन्ड्री चालकाकडून परत

राहाता |वार्ताहर| Rahata

इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांच्या पिशवीत सुमारे दहा लाखांचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम वीस हजार सापडले. परंतु मनात कुठलाही मोह न बाळगता राहाता शहरातील लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांनी सापडलेली दहा लाखांची दागिने व रोख रक्कम निरपेक्ष भावनेने ग्राहकास परत केल्याबद्दल त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोने, पैसा, संपत्ती यांच्या आकर्षणापायी भ्रष्ट झालेल्या सध्याच्या युगात प्रामाणिकपणा शोधूनही सापडणे कठीण आहे. परंतु जग कितीही बदलले तरी प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे. नीतिमत्ता व प्रामाणिकपणा आजही जगात शिल्लक आहे याचा अनुभव राहाता शहरात नुकताच आला.

शहरातील लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांच्याकडे एक पिशवी भरून कपडे इस्त्रीसाठी एका ग्राहकाने आणले होते. कामाच्या व्यस्ततेमुळे दोन-तीन दिवस या पिशवीतील कपडे इस्त्री करणे शक्य झाले नाही. त्यानंतर तिसर्‍या दिवशी इस्त्रीसाठी पिशवीतील कपडे बाहेर काढत असताना राजेश वाघमारे यांना त्या पिशवीत एक छोटीशी कापडी थैली आढळून आली. यामध्ये सोन्याची कर्णफुले, नथ, बांगड्या व इतर दागिने तसेच रोख रक्कम वीस हजार आढळून आली.

श्री. वाघमारे यांनी लागलीच याबाबतची माहिती संबंधित ग्राहकाला दिली व दुकानात येऊन आपले सोन्याचे दागिने व रक्कम घेऊन जाण्याचे सांगितले. संबंधित ग्राहकाला आपल्या पिशवीत सुमारे दहा लाख किमतीचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये होते याची पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती, असे असताना सुद्धा राजेश वाघमारे याने आपली प्रामाणिकता जपून ठेवत संबंधित वस्तू ग्राहकाला परत देऊन टाकल्या.

त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पिंपळस सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब निरगुडे व लायन्स क्लबचे उपाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्याहस्ते तसेच संचालक पोपटराव घोगळ, राहाता तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, भाऊसाहेब मेहत्रे, नामदेव लावरे, साई निर्माण उद्योग समूहाचे संचालक मुन्नाभाई शहा, समता पतसंस्थेचे मॅनेजर मिलिंद बनकर, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश जाधव, सुनील निचिते, सुनील वाणी, कांता तुपे, उमेश तुपे, संजय वाघमारे आदी मान्यवरांनी राजेश वाघमारे यांचा सहपरिवार सत्कार केला.

पैसा, सोने सापडले तर कोणी परत देत नाही. मात्र दहा लाखांचे सोन्याचे दागिने व 20 हजार रुपये सापडले असताना तसेच आपली वस्तू हरवल्याचे समोरच्याच्या ध्यानीमनी नसतानाही राजेश वाघमारे यांनी मनात कुठलाही मोह न बाळगता निरपेक्ष भावनेने संबंधित ग्राहकाला ऐवज परत करून प्रामाणिकपणा आजही जगात जिवंत असल्याचे अधोरेखित केले आहे.

- डॉ स्वाधीन गाडेकर

लॉन्ड्री हा आमचा पारंपरिक व्यवसाय असून आई-वडिलांनी पहिल्यापासून अतिशय चांगले संस्कार व प्रामाणिकपणाची शिकवण दिली आहे. त्यामुळे सोने, पैसा यापेक्षाही नीतिमत्ता व व्यवसायातील प्रामाणिकपणा याला खूप किंमत आहे. याची बरोबरी कशातच होऊ शकत नाही. कष्टाचा रुपया आपल्या सत्कारणी लागेल. परंतु हरामाचा आपल्याला कधीच पुरणार नाही. त्यामुळे कष्टाच्याच पैशाला व कष्टाने घेतलेल्या वस्तूला माझ्या मनात व कुटुंबात चांगले स्थान आहे.

- राजेश वाघमारे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com