सोन्याचे दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

महिलेची पोलिसांत फिर्याद; पैशाऐवजी दिले दगडे
सोन्याचे दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सोन्याच्या दागिन्याचे दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून दोघांनी महानगरपालिकेच्या सफाई कामगार महिलेची फसवणूक केली. महिलेकडील अडीच तोळ्यांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. पैशाऐवजी महिलेला रुमालात बांधून दगडे दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी संगीता रमेश चवालिया (वय 55 रा. मंगलगेट, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता चवालिया त्यांच्या नातीसह बाजारपेठेत गेल्या होत्या. डाळमंडई येथे त्यांना दोन युवक भेटले. त्यांनी त्यांच्याकडील बॅगमध्ये दोन लाख रुपये असल्याचे संगीता यांना सांगत पैसेही दाखविले.

त्यातील एक जण संगीता यांना म्हणाला,‘तुमच्या जवळ किती सोने आहे ते मला काढून द्या, मी तुम्हाला त्याचे दुप्पट भावाने पैसे देतो’, असे म्हटल्याने संगीता यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. यानंतर संगीता यांनी त्यांच्याकडील दीड तोळ्याचे मिनी गंठण व एक तोळ्याचे कानातील वेल, झुमके काढून दिले. संगीता यांनी चोरट्यांकडे अडीच तोळ्याचे दागिने दिल्यानंतर त्यांनी संगीता यांच्या हातात गाठोडे बांधलेला रुमाल दिला. सदरचा रुमाल घरी जाऊन सोडण्याचा सल्लाही दिला.

संगीता यांनी रुमाल घरी आल्यावर सोडून पाहिला असता त्यामध्ये दगडे मिळून आली. यानंतर संगीता यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवडाभरात दुसरी घटना

तुम्हाला सोन्याचे मणी देतो, त्याचे मोबदल्यात तुम्ही आम्हाला तुमच्या गळ्यातील सोन्याचे गंठण द्या, असे म्हणून पिशवीमध्ये वाळूचे बारिक बारिक खडे देऊन वृध्द महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार मागील आठवड्यात घडला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तीन अनोळखी महिलांविरूध्द गुन्हा दाखल आहे. चोरट्यांकडून महिलांची वेगवेगळ्या आमिषाने फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com