आठ तोळे सोन्याचे दागिने लुटले

महापालिका कर्मचारी असल्याचा बनाव
आठ तोळे सोन्याचे दागिने लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तुमच्या घराभोवती मच्छर खूप झालेले आहेत. आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत. तुमच्या घराची सफाई करण्यासाठी आलो आहोत, असा बनाव करून चार-पाच चोरट्यांनी वृध्दाच्या घरातील आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरले. केडगाव उपनगरातील अमितनगर भागात बुधवारी दुपारी ही घटना घडली.

याप्रकरणी बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले विश्‍वनाथ एकनाथ राजगुरू (वय 90) यांनी फिर्याद दिली आहे. विश्‍वनाथ राजगुरू हे केडगावातील अमितनगर भागात राहतात. बुधवारी सकाळी 11 वाजता चार-पाच जण त्यांच्या घरी आले. ‘आम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत. तुमच्या घराभोवती खूप मच्छर झालेले आहेत. आम्हाला या भागाची फवारणी करायची आहे,’ असे सांगून त्यांनी फवारणीचा बनाव केला.

काहींनी घरात घुसून सोन्याचे दागिने चोरले. यामध्ये चार तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची चेन, प्रत्येकी अर्धा ग्रॅमच्या दोन अंगठ्या, एक तोळ्याचे कानातील झुमके, अर्धा ग्रॅमच्या कानातील पळ्या असे एकुण आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून हे चोरटे साडेअकरा वाजता घरातून निघून गेले.

राजगुरू यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात ही चोरी झाल्याचे सायंकाळी लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चार-पाच चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com