13 तोळ्यांसह लाखाची रोकड लंपास

संभाजीनगर रस्त्यावरील घटना || पोलिसांत गुन्हा
13 तोळ्यांसह लाखाची रोकड लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरात सात महिन्यांपूर्वी ठेवलेले सुमारे 13 तोळ्याचे सोन्याचे दागिने व एक लाखाची रोकड असा चार लाख 90 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. 16) तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. संदीप सूर्यभान पाटोळे (वय 42 रा. शासकीय विश्रामगृहाजवळ, नगर-छत्रपती संभाजीनगर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.

पाटोळे यांच्या घरात त्यांच्या बहिणीचे दागिने ठेवलेले असतात. 5 मार्च 2023 रोजी पाटोळे कुटुंबिय त्यांच्या नातेवाईकांच्या कार्यक्रमावरून आल्यानंतर त्यांनी बहिणीचे दागिने कपाटामध्ये लॉक करून ठेवले होते. तब्बल सात महिन्यांनंतर, 29 सप्टेंबर 2023 रोजी पाटोळे हे घराची साफसफाई करत असताना त्यांना घराच्या कपाटात ठेवलेले दागिने व रोकड दिसून आली नाही. त्यामुळे पाटोळे यांनी दागिने व रोकडचा शोध घेतला असता त्यांना ते मिळून आले नाही.

चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये दोन मोठे गंठण, मिनी गंठण, एक पिळ्याची अंगठी, चार जोड कानातले, एक चकोर, एक चेन, एक डिझाईनची अंगठी, एक कानातील असे एकूण 13 तोळ्याचे दागिने होते. याशिवाय एक लाखाची रोकडही चोरीला गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतरही पाटोळे यांनी गुन्हा दाखल करण्यास उशिर केला आहे. त्यांनी 16 ऑक्टोबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com