
संगमनेर (शहर प्रतिनिधी) -
बसमध्ये बसलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शुक्रवारी संगमनेरात घडली.
साधना अण्णासाहेब म्हस्के (रा. चिखली, ता. संगमनेर) या शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास बसमध्ये बसलेल्या असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून गळ्यातील एक तोळ्याची चैन, दोन तोळ्याचे गंठण, चार ग्रॅम कानातील टॉप, 7 ग्रॅमचे मंगळसूत्र असा ऐवज लांबविला. सदर महिलेने काल सकाळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुणे येथे मुलगा आजारी असल्याने त्याच्यावर औषधोपचार करुन संगमनेरला आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 2067/2020 भारतीय दंड संहिता 379 प्रमाणे दाखल केला आहे.
पोलीस डायरीत अवघ्या 16 हजार रुपयांची चोरी दाखविण्यात आली आहे. चोरी गेलेले सोने हे 16 वर्षापूर्वी खरेदी केलेले होते. चोरी गेलेले सोने व सध्याचा भाव यात मोठी तफावत असतांना अवघे 16 हजाराचे दागिने चोरी झाल्याचे पोलिसांनी दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.