
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
तुम्हाला सोन्याचे मणी देतो, त्याचे मोबदल्यात तुम्ही आम्हाला तुमच्या गळ्यातील सोन्याचे गंठण द्या, असे म्हणून पिशवीमध्ये वाळूचे बारीक बारीक खडे देऊन वृध्द महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरस्वती विश्वनाथ वैरागर (वय 70 रा. महावीरनगर, बालिकाश्रम रस्ता) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी महिलांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शुक्रवारी दुपारी कामावरून घरी जात असताना त्यांना तीन अनोळखी महिला भेटल्या. त्यातील एक महिला फिर्यादीला म्हणाली,‘माझ्याकडे सोन्याचे मणी आहे, मला ते मणी मोडून पैसे करायचे आहे’, तुम्ही माझ्यासोबत चला’, असे म्हटल्याने फिर्यादी त्यांच्यासोबत प्रेमदान चौकातील कायगावकर सोन्याच्या दुकानात गेल्या.
सदर महिला व फिर्यादी दुकानात जाऊन बाहेर आल्यानंतर त्यांच्यासोबत असलेली दुसरी महिला फिर्यादीला म्हणाली,‘तुमच्याकडील सोन्याचे गंठण आम्हाला द्या व आमच्याकडील सोन्याचे मणी तुम्ही घ्या’, असे म्हणून फिर्यादी यांचा विरोध असतानाही त्यांच्या गळ्यातील गंठण काढून घेत त्यांना सोन्याचे मणी असल्याची पिशवी दिली. दरम्यान या पिशवीमध्ये वाळूचे बारीक बारीक खडे आढळून आले. फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.