गोदावरीचा विसर्ग 29667 क्युसेकवर!

जायकवाडी जलाशयातील उपयुक्तसाठा पोहचला 70 टक्क्यांवर
File Photo
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल घाटमाथ्यावर पावसाने विश्रांती घेतली. त्र्यंबक वगळता काल पावसाने दडी मारल्याने धरणातील आवक घटत चालल्याने गोदावरीतील विसर्ग 29667 क्युसेकवर आला आहे. काल सकाळ पर्यंत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने 26.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. खाली जायकवाडीचा उपयुक्तसाठा काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत 70 टक्क्यांपर्यंत पोहचला होता.

दरम्यान गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना सोडण्यात येणारे पाणी एक दिवस पुढे ढकलल्याने ते आज सोमवारी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रालाही दिलासा मिळणार आहे.

पावसाची विश्रांती

गेल्या दहा बारा दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू होते. दोन तीन दिवसांपासून हे प्रमाण घटत गेले. काल त्र्यंबकला 8 मिमी वगळता अन्यत्र पाऊस नाही. त्यामुळे विसर्गही घटविण्यात आले आहेत. दारणातून 8846 क्युसेक, कडवातून 1294 क्युसेक, वालदेवीतून 406 क्युसेक, गंगापूर मधून 2754 क्युसेक, आळंदीतून 447 क्युसेक, भोजापुर मधून 540 क्युसेक असा विसर्ग सुरु आहे. तसेच इतर ओढे नाले, यातुन पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने गोदावरीत या बंधार्‍यातुन 29667 क्युसेकने विसर्ग सुरु होता. त्यामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे.

जायकवाडीत 41399 क्युसेकने आवक

खाली काल सकाळी 6 पर्यंत जायकवाडीत 27.8 टीएमसी एकूण पाणी सामावले होते. काल सकाळी मागील 24 तासात 4.1 टीएमसी नविन पाणी दाखल झाले. काल शनिवारी सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार जायकवाडीचा उपयुक्तसाठा 69.89 टक्के इतका झाला होता. म्हणजेच 53.5टीएमसी पाणी उपयुक्तसाठा तयार झाला होता. तर मृतसह एकूण साठा 79.6 टीएमसी इतका झाला होता. काल सहा वाजता या धरणात 41 हजार 399 क्युसेक ने पाणी धरणात दाखल होत होते. या धरणाची मृतसह एकुण साठ्याची क्षमता 102 टीएमसी आहे. जायकवाडीत गोदावरीतील 29667 क्युसेक व प्रवरेतील 3482 क्युसेकचा विसर्ग काल सुरु होता. या व्यतिरिक्त छोट्या मोठ्या नद्या, ओढे नाल्यांचे पाणी व मराठवाड्यातील काही प्रकल्पांचे पाणी असे जायकवाडीत 41399 क्युसेकने नविन पाणी दाखल होत होते.

कालचे धरणांचे साठे !

दारणा 65.76 टक्के, मुकणे 79.33 टक्के, वाकी 49 टक्के, भाम 100 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 100 टक्के, गंगापूर 62.11 टक्के, कश्यपी 76.73 टक्के, गौतमी गोदावरी 82.71 टक्के, कडवा 70.97 टक्के, आळंदी 100 टक्के, भोजापूर 100 टक्के, पालखेड 50.38 टक्के, असे धरणांचे साठे आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com