गोदावरीत 79848 क्युसेकने विसर्ग

कोपरगावातील मौनगिरी सेतू, पुणतांब्याचा कातनाला पूल, कमालपूर बंधारा पाण्याखाली
गोदावरीत 79848 क्युसेकने विसर्ग

जायकवाडीत उपयुक्तसाठा 39.70 टक्क्यांवर, 45938 क्युसेकने आवक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडलेल्या विक्रमी पावसाने दारणा, गंगापूर च्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात नवीन पाणी दाखल होत होते. त्यामुळे या धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहेत. त्यामुळे गोदावरीत काल सायंकाळी 5 वाजता 79848 क्युसेक ने विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर काल दिवसभर काहिसा कमी झाल्याने रात्री 11 नंतर गोदावरीतील विसर्ग काहिसा घटू शकतो.

दरम्यान, कोपरगावातील मौनगिरी सेतू, हिंगणी पूल, पुणतांब्यातील कातनाला पूल, कमालपूर बंधारा पाण्याखाली गेला आहे.

काल उशीरा दारणातून 15088 क्युसेक, गंगापूर 10035 क्युसेक, कडवा 3517 क्युसेक, पालखेड 29420 क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. हे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सोमवारी रात्री 10 वाजेपासून 78276 क्युसेक ने विसर्ग दीर्घकाळ सुरू होता.

काल मंगळवारी सायंकाळी 5 वाजता यात वाढ करुन तो 79848 क्युसेक इतका करण्यात आला. त्यामुळे गोदावरीत पाण्याची रेलचेल आहे. नांदूरमधमेश्वर चा विसर्ग 90 हजार क्युसेकवर गेला तर पाणी नदीपात्र सोडू शकते. त्यामुळे गोदावरी नदीच्या कडेला असणार्‍यांना गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

दारणा च्या पाणलोटातील काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत इगतपुरीला 188 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या भिंतीजवळ 98 मिमी पावसाची नोंद झाली. घोटी ची आकडेवारी उपलब्ध होत नसली तरी तेथे इगतपूरी सारखा पाऊस पडतो. या पावसामुळे दारणात मागील 24 तासांत 1465 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे पाणी जवळपास दीड टीएमसी इतके आहे. काल सकाळ पर्यंत 1 जून पासून दारणात 5.6 टीएमसी नव्याने पाणी दाखल झाले. दारणात 70.39 टक्के पाणीसाठा स्थिर ठेवुन अतिरिक्त येणार्‍या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काल सायंकाळी दारणातून 14342 क्युसेकने पाणी सोडले जात होते. शेजारील भावलीला 174 मिमी पाऊस झाला. 24 तासांत भावलीत 128 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. भावली 73.85 टक्के भरले आहे. मुकणे 59.66 टक्के भरले आहे. वाकी 19.50 टक्के, भाम 49.19 टक्के, वालदेवी 65.14 टक्के पाणी साठा आहे.

गंगापूर धरणातुन 10035 क्युसेक ने विसर्ग सोडण्यात येत होता. गंगापूरच्या भिंतीजवळ काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत 247 मिमी असा विक्रमी पाऊस नोंदला गेला. हे धरण 66.64 टक्के स्थिर ठेऊन उर्वरित पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या धरणाच्या पाणलोटातील त्र्यंबकला 174 मिमी, आंबोलीला 294 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूर मध्ये मागील 24 तासांत 1.25 टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले. कश्यपीला 167 मिमी, गौतमी 194 मिमी असा पाऊस नोंदला गेला. कश्यपीत 48.76 टक्के, गौतमी 57.33 टक्के असा पाणीसाठा आहे. काल या धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर काहिसा घटला आहे.काल मंगळवारी सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत गंगापूरला 11 मिमी, त्र्यंबकला 27 मिमी, अंबोलीला 42 मिमी, कश्यपी 16 मिमी, गौतमीला 13 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण घटल्याने विसर्ग काही प्रमाणात कमी होवु शकतात. कडवा मध्ये 69.43 टक्के, आळंदी 85.05 टक्के, पालखेड 48.55 टक्के असे पाणी साठे तयार झाले आहेत.

दरम्यान, उर्ध्व धरणातील विसर्गामुळे खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने काल सायंकाळी 5 वाजता 79 हजार 848 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. त्या आगोदर 78276 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल सकाळी 6 पर्यंत गोदावरीत एकूण 5.5 टीएमसी विसर्ग करण्यात आला आहे. यंदा चार पाच दिवसात सर्व धरणांच्या परिसरात विक्रमी पाउस झाला. त्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 66.33 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. तो मागील वर्षी कालच्या तारखेला अवघा 22.97 टक्के इतका होता.

जायकवाडीत उपयुक्त साठा 30.44 टीएमसी

जायकवाडीत काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत जवळपास दीड टीएमसी नवीन पाणी दाखल झाले. तर 1 जून पासुन 4.4 टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले काल सायंकाळी 6 वाजता या धरणात 45 हजार 938 क्युसेक ने पाणी दाखल होत होते. जायकवाडीत उपयुक्तसाठा 39.70 टक्के पाणीसाठा तयार झाला होता. काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्तसाठा 30.44 टिएमसी इतका झाला होता.

पडलेला पाऊस (मिमीमध्ये)

भंडारदरा - 127, घाटघर - 146, पांजरे - 00, रतनवाडी - 312, वाकी - 93.

पडलेला पाऊस (मिमीमध्ये)

इगतपुरी - 188, त्र्यंबक - 174, अंबोली - 294, गौतमी - 194, दारणा - 98

गोदावरी नदीला दुसर्‍या दिवशीही पूर कायम आहे. श्रीक्षेत्र सराला बेटाजवळ वैजापूरच्या बाजूने असणारा पूल पाण्याखाली गेला आहे.
गोदावरी नदीला दुसर्‍या दिवशीही पूर कायम आहे. श्रीक्षेत्र सराला बेटाजवळ वैजापूरच्या बाजूने असणारा पूल पाण्याखाली गेला आहे.

सराला बेटाला पाण्याचा वेढा, गुरुपौर्णिमा सध्या पद्धतीने

गोदावरील आलेल्या पुरामुळे श्री क्षेत्र सराला बेटावरील वैजापूरच्या दिशेने असलेला पूल आणि श्रीरामपूरच्या दिशेने असलेल्या केटी वेअर वरून 2-3 फूट पाणी असल्याने भाविकांना बेटावर येता येणार नाही. त्यामुळे आज बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी भाविकांनी बेटावर येऊ नये, घरी राहूनच पूजन करावे, असे आवाहन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले. गोदावरी नदीला पूर आला आहे. 79 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्यानंतर बेटाकडे येणारे पूल, केटी वेअर पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने बंदोबस्त ठेवत भाविकांनी बेटावर येऊ नये असे आदेशीत केले असल्याने सराला बेटाच्या वतीनेही भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बेटावर येऊ नये, असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे.सराला बेटावरील विद्यार्थी बेटावरील सर्व समाध्यांचे पूजन करतील.

मुळा धरण 45 टक्क्यांवर

कोतूळ |वार्ताहर| Kotul

जिल्ह्यातील धरणांमध्ये सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात जोरदार पाण्याची आवक होत आहे. काल मंगळवारी सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 11102 दलघफू (42.70 टक्के) झाला.पाण्याची आवक सुरू असल्याने आज -उद्यापर्यंत हे धरण 45 टक्के भरलेले असेल.

सोमवारी धो धो पाऊस झाल्याने काल मंगळवारी मुळाच्या सकाळचा विसर्ग 1300 क्युसेकवर पोहचला होता. पण त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने विसर्गही घटू लागला आहे. हा विसर्ग सायंकाळी 5638 क्युसेक होता. 8 जुलैपासून या धरणात नव्याने 2871 दलघफू पाणी जमा झाले आहे.

निळवंडे 60 टक्के भरण्याच्या मार्गावर

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या रतनवाडीत साडेबारा इंच पाऊस झाल्याने अपेक्षेप्रमाणे भंडारदरा धरणातील पाणीसाठा 52 टक्क्यांवर गेला आहे. निळवंडे 60 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. काल सायंकाळी 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 4766 दलघफू (57.28 टक्के ) झाला होता. पाऊस सुरू असल्याने हे धरण आज 60 टक्के भरणार आहे.

पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने गत 24 तासांत भंडारदरात 552, निळवंडेत 379 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा गतीने वाढत आहे. आठ दिवसांत भंडारदरात 3320 दलघफू नवीन पाणी आले. प्रवरा, मुळा, आढळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा तासागणिक वाढू लागला आहे.

कुकडीतील पाणीसाठा 25 टक्क्यांवर

दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गत 24 तासांत रविवारच्या तुलनेत अधिक आवक झाली. रविवारी 1740 दलघफू तर सोमवारी 1827 तर मंगळवार सकाळपर्यंत तब्बल 2415 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा आता 25 टक्क्यांवर पोहचला आहे.

पडणारा पाऊस आणि होणारी आवक यामुळे या धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा 5958 दलघफू (24 टक्के) झाला होता.त्यानंतर दुपारी हा पाणीसाठा 25 टक्क्यांवर गेला. अजूनही पाऊस सुरू असल्याने आवक सुरू आहे.

गतवर्षी याच काळात 5289 दलघफू पाणीसाठा होता. यंदा जादा पाणीसाठा आहे. आठ दिवसांत तब्बल 15 टक्के पाणीसाठा वाढला आहे. कालतर विक्रमी आवक झाली.

येडगाव धरणात 396, माणिकडोह 620, वडज 245, पिंपळगावजोगे धरणात551 दलघफू तर डिंभेत 602 दलघफू नवीन पाणी आले. डिंभे कालवा सुरू होता तो काल बंद करण्यात आला. दुपारी चिल्हेवाडी सांडावा विसर्ग सुरू आहे. वडज सांडवा विसर्ग सुरू आहे.

घोडमध्ये आवक

घोड धरणातही आता पाण्याची नवीन आवक सुरू झाली आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 28 दलघफू नवीन पाणी आले. सध्या या धरणात 1527 दलघफू पाणीसाठा आहे.

पडलेला पाऊस (मिमीमध्ये)

येडगाव - 51, माणिकडोह - 91, वडज - 53, पिंपळगावजोगे - 49, डिंभे - 44

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com