पाणलोट क्षेत्र तुपाशी तर लाभक्षेत्र उपाशी !

धरणक्षेत्रातील पावसाने गोदावरी दुथडी, पण कालवे कोरडेठाक !
पाणलोट क्षेत्र तुपाशी तर लाभक्षेत्र उपाशी !

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

धरणांच्या पाणलोटात पावसाची जोरदार बॅटिंग होतेय, धरणंही चार पाच दिवसांत अनपेक्षीतपणे भरली! जायकवाडीच्या दिशेने पाणी गोदावरीत दुथडी भरून वाहते आहे. नदीला पूरजन्य स्थिती आहे. असे असताना गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात मात्र बुरबुर आहे. पाणलोटक्षेत्र तुपाशी तर लाभक्षेत्र उपाशी अशी स्थिती आहे. गोदावरी कालव्यातून ओव्हरफ्लो सोडावा, तळे, साठवण बंधारे भररून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

धरणं भरतील, जायकवाडीला पाणी ही जाईल, जायकवाडीला उर्ध्व धरणातून पाणी सोडण्याची वेळ येणार नाही, मागील दोनतीन वर्षांपासून हे घडते. मात्र असे होऊनही लाभक्षेत्राला धरणातील पुरेसे पाणी, पुरेसे आवर्तन मिळतात का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात शेतकर्‍यांमध्ये नैराश्य आहे. नाशिकची धरणं भरली आणि जायकवाडी जलाशय ही तुडूंब भरला तरी गोदावरी कालव्या बाबत मागील काही वर्षांचा अनुभव पाहता, शेतकर्‍यांच्या मनात फारसे आशादायी चित्र नाही.

समन्यायी पाणी वाटपाचे भूत गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रावर बसले आहे. लाभक्षेत्रातील बंधारे रिकामेच आहे. नदी मात्र ओसंडून वाहते. किमान ओढे नाले भरले तर काही महिने विहिरींना आधार होतो. मात्र तसे घडताना दिसत नाही. मेंढेगिरी अहवालातील एकूण सहा पर्यायापैकी पहिल्या पर्यायात जायकवाडीमध्ये 28 टिएमसी म्हणजे 37 टक्के पाणीसाठा होत नाही तोपर्यंत खरीप पिकांसाठी पाणी सोडता येत नाही. मात्र 28 टिएमसी म्हणजे 37 टक्के पाणीसाठा झाला असेल तर एकूण खरीप क्षेत्राच्या 80 टक्के खरीप क्षेत्राला पाणी देता येते.

तसेच पर्याय क्रमांक दोन म्हणजे जायकवाडीत 41.5 टिएमसी म्हणजे 54 टक्के पाणी झाल्यावर खरीपाच्या एकूण क्षेत्राच्या 80 टक्के क्षेत्रास अधिक रब्बीच्या एकूण क्षेत्राच्या 32 टक्के क्षेत्राला पाणी देता येते. याप्रमाणे पुढील पर्यायाप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे. परंतु बहुचर्चित पर्याय क्रमांक तीन म्हणजे जोपर्यंत जायकवाडीतील पाणीसाठा 65 टक्के म्हणजे 50 टिएमसी होत नाही तोपर्यंत, नगर नाशिकमध्ये पिकांना पाणी देऊ नये, याचेच गारुड प्रशासनावर पडलेले दिसत आहे. तसेच ते जनमानसावरही बिंबवले जावे, यासाठी सातत्याने चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. क्षेत्रिय पातळीवर पीकव्यवस्था कशी जगेल, यावर फोकस देण्याऐवजी, नेहमीच अहवालाचा बागुलबुवा दाखवून कागदी घोडे नाचवले जातात.

पाणी प्रश्नाचे जाणकार जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यातील बारकावे उलगडून दाखवताना सोबत काही मार्मिक सवाल करत, यातील वास्तव स्पष्टपणे नमूद करतात. सार्वमतशी बोलतांना ते म्हणाले, उर्ध्व धरण कालवे लाभक्षेत्रातील खरीप हंगामातील पिकांना पाणी देऊ नये, असे मेंढीगिरी अहवालात कोठेही म्हटलेले नाही. प्राप्त परीस्थितीत जी शिफारस लागू होईल त्या शिफारसी (फॉर्म्युला) प्रमाणे उर्ध्व धरण लाभक्षेत्रातील खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यात यावे, असे मेंढीगिरी अहवाल सांगतो.

जर 15 ऑक्टोबर नंतर जायकवाडी साठी पाणी सोडण्याची वेळ आली तर उर्ध्व धरण लाभक्षेत्रातील पिकांना खरीप हंगामासाठी जे पाणी वापरलेले ते पाणी हिशेबात धरण्यात येईल व प्राप्त परीस्थितीत मेंढीगिरी अहवालातील सहा शिफारसी (फॉर्म्युला) पैकी जी शिफारस लागू होईल, त्याप्रमाणे जायकवाडीस पाणी सोडण्यात येईल. अशी स्थिती असताना प्रशासनाकडून जायकवाडी 65 टक्के झाले नाही आणि ओव्हरफ्लोचे पाणी कालवे, नाल्यात वळविता येणार नाही, ही कॅसेट वाजवली जाते. अहो कोण म्हणतेय कालवे, नाल्यात सोडा म्हणून. लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस नाही.

खरिपाला पाणी पाहिजे. जायकवाडी 37 टक्के झालेय. पर्याय क्रमांक एक लागू झाला आहे. त्याप्रमाणे पाणी सोडा ना! मेहरबानी नको आम्हाला. हे पाणी आमच्या हिशोबातून वजा करा. नाही कोण म्हणतो तुम्हाला. पण यावर प्रशासनाचे मासलेवाईक उत्तर असे असते, तुम्हाला आताच पाणी दिलेतर बारमाहीत उन्हाळ्यात पाणी द्यायला शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आता पाणी देता येणार नाही! मांडीवरचं मारणी घालायचं अन् पोटातल्याची काळजी करायची. हा कोणता न्याय? ही स्थिती कायम खरिपात राहिली तर खरिपात पाटपाणी इतिहास जमा होईल हे नक्की!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com