गोदावरीत 16865 क्युसेकने विसर्ग
सार्वमत

गोदावरीत 16865 क्युसेकने विसर्ग

गोदावरी दुथडी! पावसाची संततधार,दारणा 92, गंगापूर 64 टक्के

Arvind Arkhade

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काल दिवसभर पावसाची मध्यम स्वरुपाची संततधार सुरुच होती. दारणाच्या पाणलोटात काल सकाळी 6 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाल्याने दारणाचा विसर्ग काल 9956 क्युसेक इतका करण्यात आला होता.

पाणलोटात पाऊस अन् दारणाचा सामावणारा विसर्ग यामुळे नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 16865 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. दारणा 92 टक्क्यांहून अधिक भरले तर गंगापूर 64 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे 145 मिमी नोंद झाली. पावसाची घोटीला 106, तर दारणाच्या भिंतीजवळ 64 मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी सहा पर्यंत मागील 24 तासांत दारणात 228 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले.

हे धरण सकाळी 92.13 टक्के भरले होते. दिवसभरात पाण्याची आवक वाढत गेली. दारणातून काल गुरुवारी पहाटे 4 वाजता 4202 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो सकाळी 6 वाजता 5678 क्युसेकने इतका करण्यात आला. पाण्याची आवक वाढल्यानंतर दारणातून काल दुपारी 12 नंतर 9956 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येऊ लागला.

दारणाचे तीन वक्राकार गेट तीन फुटांनी उचलण्यात आले आहेत. त्यातून तसेच जलविद्युत केंद्राच्या गेटमधून असा पाण्याचा विसर्ग सुरु होत आहे. भावलीच्या पाणलोटातही काल सकाळी 6 पर्यंत 76 मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी 6 पर्यंत 54 दलघफू भावलीत नवीन 54 दलघफू पाणी दाखल झाले होते. भावलीच्या सांडव्यावरुन 701 क्युसेकने विसर्ग दारणाच्या दिशेने वाहत येत आहे.

पाच वक्राकार दरवाजे उघडले

दारणातील पाणी खाली नांदूरमधमेश्वरच्या दिशेने वाहत आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटातील पावसाचे पाणी असे पाणी दाखल होत असल्याने काल सकाळी 6310 क्युसेकने गोदावरीत सुरु असलेला विसर्ग काल सकाळी 9 वाजता 9465 क्युसेक करण्यात आला. त्यानंतर काल सायंकाळी 5 वाजता त्यात वाढ करुन तो 16865 क्युसेक इतका करण्यात आला. नांदूरमधमेश्वर बंधार्‍याचे पाच वक्राकार नदी गेटवर करण्यात आले आहेत. एक ते दीड मिटरने हे दरवाजे उचलण्यात आले आहेत. नदी मार्गे हे वेगाने पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे.

गंगापूरच्या पाणलोटातही संततधार

गंगापूर धरणाच्या पाणलोटातही पावसाची मध्यम संततधार सुरु होती. गंगापूर धरणाचा काल सकाळी 6 वाजता साठा 60.19 टक्के इतका झाला. 24 तासांत गंगापूरला 55, त्र्यंबकला 66, अंबोलीला 70 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासांत गंगापूर धरणात 107 दलघफू नविन पाणी दाखल झाले. 5630 क्षमतेच्या गंगापूर मध्ये 3389 दलघफू पाणीसाठा होता. काल दिवसभर गंगापूर धरणाच्या पाणलोटात पावसाची मध्यम संततधार सुरु होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या 12 तासांत गंगापूरला 35 मिमी, त्र्यंबकला 48 मिमी, अंबोलीला 74 मिमी पावसाची नोंद झाली. तर कश्यपीला 13 तर गौतमीला 22 मिमी पावसाची नोंद झाली. गौतमी गोदावरी 32.37 टक्के, तर कश्यपी 28.88 टक्के भरले होते.

अन्य धरणांचे साठे असे- पालखेड 5063 टक्के, कडवा 50.95 टक्के, मुकणे 46.01 टक्के, भोजापूर 57.06 टक्के, आळंदी 7.23 टक्के, कश्यपी 28.88 टक्के, वालदेवी 48.81 टक्के, गौतमी गोदावरी 37.72 टक्के, वाकी31.36 टक्के, भाम 82.74 टक्के. हरणबारी 100 टक्के, हरणबारीतून 846 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. गोदावरीचा विसर्ग ही जायकवाडी जलाशयात सुरु आहे. काल वैजापूर तालुक्यातील नागमठाण सरिता मापन केंद्राजवळून गोदावरीत 2140 क्युसेक ने विसर्ग मिळत होता. काही तासांत हा विसर्ग वाढलेला असेल असे तेथील कालवा निरीक्षक आर. के. बागुल यांनी सार्वमतशी बोलतांना सांगितले.

जायकवाडी 57.57 टक्के !

जायकवाडी जलाशयात उपयुक्तसाठा 57.57 टक्के इतका झाला होता. उपयुक्तसाठा 44.14 टीएमसी तर मृतसह एकूण साठा 70.21 टीएमसी इतका आहे. एक जूनपासू न जायकवाडीत 20.4 टीएमसी पाणी कालपर्यंत नव्याने दाखल झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com