गोदावरीत 24 हजार क्युसेकने विसर्ग!

दारणा 7200, गंगापूर 4009 क्युसेकने विसर्ग, जायकवाडी 60 टक्के
गोदावरीत 24 हजार क्युसेकने विसर्ग!
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गंगापूर (Gangapur), दारणा धरणांच्या (Darna Dam) पाणलोटात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. गंगापूरचा (Gangapur) विसर्ग 4009 क्युसेकने सुरु होता, होळकर ब्रिज जवळ 9000 क्युसेकने विसर्गांची नोंद होत होती. तर दारणाचा (Darna) विसर्ग 7200 क्युसेकने सुरू होता. पालखेड (Palkhed) मधुनही 2100 क्युसेकने विसर्ग दाखल होत असल्याने गोदावरीत (Godavari) नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) बंधार्‍यातून काल रात्री 9 च्या आकडेवारीनुसार 23905 क्युसेकने विसर्ग जायकवाडीच्या दिशेने सुरू होता.

नाशिकच्या (Nashik) गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोटात काल दिवसभरात तसेच काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सकाळी 6 पर्यंत 162 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. काल सकाळी 6 वाजता 1562 क्युसेकने सुरु असलेला गंगापूरचा (Gangapur) विसर्ग काल दुपारी 3 वाजता 3608 क्युसेक करण्यात आला. पुन्हा तो 4 वाजता 4009 क्युसेक इतका वाढविण्यात आला. 98.56 टक्के पाणी साठा स्थिर ठेऊन इतर नवीन दाखल होणारे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत गंगापूरच्या (Gangapur) पाणलोटातील अंबोली (amboli) येथे 121 मिमी, त्र्यंबकला 60 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर च्या भिंतीजवळ 65 मिमी पावसाची नोंद झाली.

तर काल सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत भिंतीजवळ 38 मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभरातील या 11 तासात गंगापूर मध्ये 120 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. पाणलोटातील त्र्यंबक येथे 36 मिमी, अंबोली येथे 68 मिमी पावसाची नोंद झाली. काल सायंकाळी या समुहातील कश्यपी 77.75 टक्के भरले. गौतमी गोदावरी (Godavari) 90.38 टक्के भरले आहे. गंगापूर मधुन नांदूरमधमेश्वरच्या दिशेने 4009 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. होळकर ब्रिज जवळ आळंदी व अन्य ठिकाणच्या पाण्यामुळे गोदावरीत 9000 क्युसेक ने विसर्गाची नोंद होत होती.

दारणा धरणाच्या (Darna Dam) इगतपुरी व घोटी परिसरात पावसाची रिपरिप सुरु होती. दारणाच्या भिंतीजवळ दिवसभरात 12 मिमी पावसाची नोंद झाली. तर भावलीला 40 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी 6 वाजता मागील संपलेल्या 24 तासांत दारणात जवळपास 1 टीएमसी नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे 10 हजार 60 क्युसेकने विसर्ग सुरु होता. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत इगतपुरीला 93 मिमी, घोटीला 70 मिमी तर दारणाच्या भिंतीजवळ 30 मिमी, भावलीला (Bhavali) 99 मिमी पावसाची नोंद झाली. भाम ला 56 मिमी अशी पावसाची नोंद झाली. 97.31 टक्के पाणीसाठा (Water Storage) स्थिर ठेवत अन्य पाण्याचा विसर्ग दारणातुन करण्यात येत आहे. दारणात (Darna) भाममधुन (Bham) 3150 क्युसेकने, भावलीतुन 481 क्युसेकने विसर्ग दाखल होत होता. काल दुपारी 3 वाजता नवीन पाण्याची आवक मंदावल्याने दारणाचा विसर्ग घटवून 7200 क्युसेक वर आणण्यात आला. हा विसर्ग उशीरापर्यंत टिकून होता.

कडवातुन काल सकाळी 2200 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो 10 वाजता 2544 क्युसेक इतका झाला. पुन्हा सायंकाळी 6 वाजता तो 1272 क्युसेक वर आला. वालदेवीतुन 183 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. तर पालखेड धरणातुनही विसर्ग सुरु झाला असल्याने पालखेड 2100 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

वरील सर्व धरणांचे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने गोदावरीत काल रात्री 9 वाजता 23905 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. त्याआगोदर तो 16582 क्युसेक इतका होता. नांदूरमधमेश्वर बंधार्‍याचे सहा ही वक्राकार गेट काही प्रमाणात वर उचलण्यात आले आहेत. काल सकाळी 6 पर्यंत 1 जून पासुन 8.1 टिएमसी पाण्याचा विसर्ग एकूण करण्यात आला आहे. 23 हजार 905 क्युसेक वेगाने पाणी वाहत असल्याने गोदावरी दूथडी भरुन वाहु लागली आहे.

जायकवाडीत 60 टक्के उपयुक्तसाठा !

जायकवाडी मध्ये काल सायंकाळी 6 वाजता 45.85 टिएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. हे धरण 59.79 टक्के भरले आहे. तर याच वेळी 32 हजार 500 क्युसेक ने पाण्याची आवक होत होती. पाण्याची आवक पाहता आज सायंकाळी अथवा उद्या सायंकाळ पर्यंत जायकवाडीचा उपयुक्त साठा 50 टिएमसी पर्यंत म्हणजेच 65 टक्के पर्यंत पोहचेल असा अंदाज आहे. हे नगर तसेच नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. साठा 50 टिएमसी झाल्यानंतर जायकवाडीला या दोन्ही जिल्ह्यातील धरणांमधुन कायदेशीररित्या पाणी सोडण्याची गरज पडणार नाही. नगर जिल्ह्यातील भंडारदरा- निळवंडेतुनही विसर्ग सुरु झाला आहे. तोही उद्या पर्यंत जायकवाडीच्या बॅक वॉटर असलेल्या प्रवरासंगम येथे दाखल होईल. गोदावरीतुन विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गंगापूर, वैजापूर भागातील छोट्या मोठ्या नद्या, ओढे हेही गोदावरीत विसावत आहेत. त्यामुळे जायकवाडीचा साठा बर्‍या पैकी वाढू शकेल असा अंदाज आहे.

नगरकरांची चिंता मिटणार

जायकवाडीत काल सायंकाळी उपयुक्तसाठा 60 टक्क्यांवर पोहचला आहे. समन्यायीच्या धोरणानुसार 65 टक्के उपयुक्तसाठा होण्यास अवघे काही तास बाकी आहेत. काल सायंकाळी जायकवाडीत 32500 क्युसेक ने नवीन पाणी दाखल होत होते. प्रवरेचे पाणीही आज जायकवाडीत आज दाखल होण्याची शक्यता आहे. त्ययामुळे अजूनही धरणात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरकरांची चिंता मिटणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com