
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
काल दिवसभरात पावसाची घाटमाथ्यावर रिपरिप होती. मात्र अन्यत्र कडक ऊन पडले होते. त्यामुळे गोदावरीतील विसर्ग सायंकाळी 3735 क्युसेक इतका करण्यात आला आहे. दारणातील 1250 क्युसेक, भावलीचा 290 क्युसेक तर कडवातील 672 क्युसेक चा विसर्ग स्थिर होता. पण रात्री 9 वाजता गोदावरीतील विसर्ग 1714 क्युसेकवर आला होता.
दोन दिवसांपासून घाटमाथ्यावरचा व अन्य धरणक्षेत्रात परिसरात पावसाचा जोर ओसरला आहे. काल घाटमाथ्यावर अधून मधून रिपरिप सुरु होती. तर नाशिक भागात कडक ऊन होते. 2 ऑगस्टनंतर पावसाची चिन्हे असल्याचे जाणकार सांगतात. नाशिक जिल्ह्यातील धरणांचे साठे 60.65 टक्क्यांवर पोहचले आहेत. गत वर्षी हे साठे कालच्या तारखेला 83.34 टक्के इतके होते.
दारणाचा साठा काल सकाळी 78.14 टक्के इतका होता. मागील 24 तासांत दारणात 331 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. मात्र या धरणाच्या पाणलोटातील पावसाचा जोर कमी झाल्याने या धरणातून करण्यात येणारा विसर्ग 1250 क्युसेक इतका करण्यात आला आहे. काल सकाळ पर्यंत दारणातून आतापर्यंत अडीच टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. भावली धरण 100 टक्के भरले आहे.
या धरणातून काल सकाळ पर्यंत 190 दलघफू पाण्याचा विसर्ग झाला आहे. गंगापूरचा विसर्ग बंद आहे. गंगापूरमध्ये काल सकाळी 75.40 टक्के पाणी साठा होता. मुकणेमध्ये 67.85 टक्के, वाकीमध्ये 43.90 टक्के, भाममध्ये 86.12 टक्के, वालदेवीमध्ये 43.16 टक्के, कश्यपीमध्ये 41.79 टक्के, गौतमी गोदावरीमध्ये 42.56 टक्के, कडवामध्ये 77.13 टक्के, आळंदीमध्ये 37.25 टक्के असा पाणी साठा आहे.
खाली नांदूरमधमेश्वर बंधार्यात वरुन पाण्याची आवक कमी झाल्याने परवा उशीरा या बंधार्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने सोडला जाणारा विसर्ग कमी करुन तो 3735 क्युसेक वर आणण्यात आला. काल उशीरा पर्यंत हा विसर्ग स्थिर होता. काल सकाळ पर्यंत या बंधार्यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 4 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.