गोदावरीतील विसर्ग 2421 क्युसेकवर

File Photo
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल सह्यद्रिच्या घाटमाथ्यावर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने विसर्ग ही कमी करण्यात आले. दारणाचा विसर्ग 1896 वरून 1313 क्युसेकवर आणण्यात आला. दारणाचे (Darna) वक्राकार दरवाजे बंद करण्यात आले. विद्युत प्रकल्पाच्या गेटमधून हा विसर्ग सुरू आहे. खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात (Nandurmadhameshwar dam) नविन पाण्याची आवक कमी झाल्याने गोदावरीतील (Godavari) विसर्ग 3228 क्युसेकने सुरू होता तो कमी करून 2421 क्युसेक वर स्थिर ठेवण्यात आला आहे.

काल धरणांच्या पाणलोटात कडक उन पडले होते. 10 ऑगस्ट नंतर जोरदार पावसाची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नविन पाण्याची आवक मंदावल्याने विसर्ग काहीसे घटले आहेत. दारणाच्या पाणलोटात (watershed of Darna) काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ अवघा 5 मिमी पाऊस पडला. पाणलोटातील इगतपुरीला (Igatpuri) 22 मिमी, घोटीला 26 मिमी पावसाची नोंद झाली. दारणात भावलीतील (Bhavali) 135 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग दाखल होत आहे.

छोटे मोठे धबधबे अजुनही वाहत आहेत. असे एकूण 24 तासांत दारणात 234 दलघफू नविन पाणी दाखल झाले. दारणाचा साठा 76.78 टक्के होता. या धरणातील विसर्ग काल सकाळी 6 वाजता 1896 क्युसेक इतका होता. काल सायंकाळी 6 वाजता तो 1313 क्युसेकवर आणण्यात आला. दारणाचे वक्राकार गेट बंद करण्यात आले आहेत. केवळ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून हा विसर्ग सुरू आहे. दारणाच्या खाली दारणा नदीत वालदेवी धरणातील विसर्ग दाखल होत आहे. वालदेवीतून 241 क्युसेक ने विसर्ग सुरू आहे. दारणातील व वालदेवीतील हा विसर्ग दारणा नदीतून गोदावरीत दाखल होत आहे. हा विसर्ग गोदावरीवरील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने गोदावरीत विसर्ग सुरू आहे.

नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून काल सकाळी 6 वाजता 3228 क्युसेकने विसर्ग सुरू होता. पाण्याची आवक कमी झाल्याने हा विसर्ग सकाळी 9 वाजता 2421 क्युसेकवर आणण्यात आला. तो रात्री उशीरापर्यंत टिकून होता. काल सकाळी 6 वाजेपर्यंत गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 3.9 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. म्हणजेच 45 हजार 550 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे.

गंगापूर धरणातील विसर्ग बंद आहे. गंगापूरमध्ये काल सकाळी 6 वाजता 76.96 टक्के पाणी साठा होता. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत गंगापूरच्या पाणलोटात अंबोलीला 34 मिमी, त्र्यंबकला 24 मिमी, तर गंगापूरच्या भिंतीजवळ 47 मिमी पावसाची नोंद झाली. काल दिवसभर या धरणाच्या परिसरात कडक ऊन पडलेले होते. या धरणातून अर्धा टीएमसी हून कमी (440 दलघफू) पाण्याचा विसर्ग यापूर्वी करण्यात आला.

जायकवाडीत उपयुक्तसाठा 30.94 टीएमसी

जायकवाडीत उपयुक्तसाठा 30.94 टिएमसी आहे. तर 40.36 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर एकूण पाणीसाठा 57 टिएमसी इतका आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com