गोदापात्रात 45 हजार क्युसेकने विसर्ग!

 File Photo
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

पावसाच्या संततधारेने वरील धरणांतून मोठी आवक होऊ लागल्याने नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून काल 45654 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे गोदापात्र तुडूंब भरून वाहत होते. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सह्याद्रीचा घाटमाथा मुसळधार पावसाने झोडपून काढला आहे. हा पाऊस सर्वदूर होत असल्याने पाण्याची सर्व ठिकाणाहून आवक सुरुच आहे. नाशिकची धरणे भरलेली आहेत. त्यामुळे धरणांच्या गेटमधून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. रविवारी रात्री 12 नंतर धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत होता.दारणातून 7470 क्युसेक, मुकणेतून 1089 क्युसेक, कडवातून 3348 क्युसेक, वालदेवीतून 407 क्युसेक, गंगापूर मधून 7952 क्युसेक, आळंदी 446 क्युसेक, भोजापूर 990 क्युसेक, पालखेड 20544 क्युसेक असा विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून 45654 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता.

काल सायंकाळी 6 वाजता हा विसर्ग कमी कमी करत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन 25240 क्युसेक करण्यात आला. सर्वच धरणांचे विसर्ग काहीसे कमी झाले. दरम्यान खाली जायकवाडीतुन 1 लाखाहुन अधिक क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. तो काल सायंकाळी6 वाजता 80672 क्युसेक इतका करण्यात आला. यावेळी भंडारदरातून 3250 क्युसेक, निळवंडेतून 4063 क्युसेक, मुळातून 7000 क्युसेकने करण्यात येत होता.

गोदावरीतून 100 टीएमसीचा विसर्ग !

नाशिक जिल्ह्यातील धरणातुन सोडण्यात आलेले विसर्ग निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होतात. 1 जून पासुन काल सकाळी 6 पर्यंत या बंधार्‍यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 100 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कालच्या विसर्गाने हा आकडा 106 टिएमसी पर्यंत पोहचणार आहे. 7 टिएमसी च्या दारणातुन काल पर्यंत 25 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 5.6 टिएमसीच्या गंगापूर मधुन 10 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.कडवातुन 8 टिएमसीचा विसर्ग, फिडर डॅम असलेल्या भाम मधुन 6 टिएमसीचा विसर्ग एक जुन पासुन करण्यात आला आहें.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com