सरकारी कामाच्या नावाखाली सराला हद्दीतून वाळूचा उपसा

श्रीरामपूरच्या प्रशासनाकडून पंचनामा || मात्र वाळूचोर अज्ञात
File Photo
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सरकारी कामाच्या नावाखाली गोदावरी नदीपात्रातून सुमारे 200 ते 300 ब्रास वाळू उचलण्यात आल्याने महसूल विभागाने या उत्खनन केलेल्या जागेचा पंचनामा केला. मात्र ही वाळू कोणी उचलली याचा थांगपत्ता न लागल्याने दंडात्मक कारवाई कोणावर करायची? असा प्रश्न प्रशासनातील अधिकार्‍यांना पडला आहे.

औरंगाबाद येथील कामासाठी गोदावरी नदीपात्रातून वैजापूर हद्दीतून वाळू उत्खनन करण्याचा परवाना मिळाल्यानंतर संबंधित ठकेदाराने वाळू उचलली. मात्र वैजापूर तालुक्याच्या हद्दीतून वाळू उपसा केल्यानंतर ठेकेदाराने श्रीरामपूर तालुक्यातील सराला गोवर्धन येथूनही वाळू उपसा केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्याने या वाळू उत्खनन केलेल्या जागेचा पंचनामा करण्याचे आदेश कामगार तलाठ्याला देण्यात आले. संबंधित तलाठी, सरपंच व पंचासमक्ष या जागेचा पंचनामा करण्यात आला. सुमारे 200 ते 300 ब्रास वाळूचे उत्खनन केल्याचा पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला.

मात्र अतिरिक्त वाळू उत्खनन कोणी केले, याचा पंचनाम्यात उल्लेख नाही. याबाबत तलाठ्याकडे विचारणा केली असता, ही वाळू कोणी उचलली हे सरपंचासह कोणालाच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नोटीस कोणाला काढायची? तसेच दंडात्मक कारवाई कोणावर करायची? हा मोठा प्रश्न असल्याचे प्रशासनातील एका अधिकार्‍याने सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com