गोदावरी नदीवरील घाटांची व रस्त्याची दयनीय अवस्था

गोदावरी नदीवरील घाटांची व रस्त्याची दयनीय अवस्था

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधी मंदिराजवळ पश्चिम बाजूला असलेल्या विठ्ठल घाट तसेच नदीपात्रात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाल्यामुळे विविध धार्मिक विधीसाठी येणार्‍या भाविकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे.

महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पुणतांबा येथे मोठ्या संख्येने भाविक योगीराज चांगदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तसेच विविध धार्मिक विधी करण्यासाठी येत असतात. या धार्मिक स्थळाचे महत्व ओळखून अहिल्याबाई होळकर यांनी नदीच्या काठावर घाट बांधलेला आहे तसेच आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही योगीराजांच्या समाधी मंदिराजवळ पश्चिमेला विठ्ठल घाट तसेच नदीपात्रात रस्ता बांधून भाविकांची सोय केलेली आहे.

मात्र सध्या रस्ता अत्यंत खराब झालेला असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेही पडले आहे. विशेष म्हणजे नदीपात्रातील पाणी संपल्यावर पुणतांब्याचे ग्रामस्थ व भाविक यांना पुणतांबा गावात जाण्यासाठी पुलाखालून जाणारा हा मार्ग अत्यंत जवळचा आहे. तसेच वाळूची तस्करी करणार्‍या तस्करांनाही वाळूच्या साधनांची वाहतूक करण्यासाठीही हा रस्ता वापरला जात असल्यामुळे त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे घाट सुद्धा अनेक ठिकाणी खराब झाला असून काही ठिकाणी घाटावरील फरशाही निघाल्या असून बर्‍याच ठिकाणी त्या फुटलेल्या आहेत. पुणतांबा येथे गोदावरी नदीवर बांधलेल्या सर्वच घाटांची शासनाने विशेष निधी मंजूर करून डागडुजी करावी, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com