गोदावरी नदीपात्रातून होणारा बेकायदेशीर वाळू उपसा थांबवावा

सराला ग्रामपंचायतची मागणी
गोदावरी नदीपात्रातून होणारा बेकायदेशीर वाळू
उपसा थांबवावा
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील सराला येथील गोदावरी नदीपात्रातून होणारा बेकायदेशीर वाळू उपसा त्वरीत थांबवावा व वाळू तस्करांकडून ग्रामस्थांना होणारी दमबाजी याबाबत महसूल विभाग व पोलीस विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी सराला ग्रामपंचायतचे सरपंच शंकर विटेकर, उपसरपंच रेवन्नाथ औताडे व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सराला येथील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांना व पदाधिकार्‍यांना वाळूतस्करांकडून दमबाजी व धमकी दिली जात असल्याने सराला गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक आदींना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सराला गावामधील गोदावरी नदीपात्रात सदर ठिकाणी ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा योजनेची विहिर व इतर शेतकर्‍यांच्या शेतीपुरक विहिरी आहेत. सध्या करोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने लॉकडाऊनचे सराला गावाने कसोशीने पालन करीत आहे.

अशा परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणा व पोलीस प्रशासन लॉकडाऊनच्या अंमलबजावणीमध्ये व्यस्त असून याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन परिसरातील वाळू तस्करांनी सराला हद्दीतील जुने गावठाण व नवीन गावठाण लगतच्या गोदावरी नदीपात्रातून रात्री-अपरात्री जेसीबी मशीन, डंपर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेसुमार वाळूचोरी सुरू केली आहे. सततच्या वाळू उपशाने ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेची व शेतकर्‍यांच्या विहिरींचे पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली असून ऐन उन्हाळ्याच्या तोंडी गावास पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com