गोदावरी नदीवरील पुलाचा प्रश्न 40 वर्षांपासून प्रलंबित - संदीप वहाडणे

गोदावरी नदीवरील पुलाचा प्रश्न 40 वर्षांपासून प्रलंबित - संदीप वहाडणे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा परिसर व गोदावरी नदीकाठच्या गावांसाठी विकासाचे वरदान ठरणार्‍या गोदावरी नदीवरील पुरणगाव येथील नियोजित पुलाचे काम गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित आहे. या पुलाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी येथील बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष संदीप वहाडणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गोदावरी नदीला 1973 पर्यंत भर उन्हाळ्यात सुद्धा गुडघाभर पाणी वाहत होते. तसेच पावसाळ्यात मात्र छोट्या नावेचा वापर जाण्या-येण्याकरिता केला जात होता. 1980 नंतर उन्हाळ्यात गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडत होते. पुरणगाव, लाख, बापतरा सह अनेक गावांतील ग्रामस्थ, विद्यार्थी पुणतांबा येथे येण्यासाठी गोदावरी नदीवरील पुलाचा नंतर पुणतांबा येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा झाल्यानंतर त्या बंधार्‍याच्या पुलाचा वापर करत होते.

मात्र ते गैरसोयीचे ठरत होते. म्हणून गोदावरी नदीकाठच्या ग्रामस्थांनी राज्य शासनाकडे वारंवार पुरणगाव येथे छोटा पूल बांधण्याची मागणी केलेली आहे. मात्र गोदावरी नदीची निम्मी हद्द वैजापूर तालुक्यात तसेच काही राहाता तालुक्यात तर काही श्रीरामपूर तालुक्यात आहे. त्यामुळे तीनही तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी पुरणगाव येथे पूल होण्यासाठी फारसा उत्साह दाखविला नाही.

तसेच पुरणगाव येथे पुलासाठी भक्कम पाया नसल्याची सबब करून या पुलाची जागा लाखगंगा बापतरा गावाजवळ गेली. या जागेचे दोन वेळा सर्व्हेक्षण झाले. 2008 मध्ये तांत्रिक मंजुरी मिळाली. तसेच 8 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. मात्र काही कारणामुळे हे काम मार्गी लागले नाही.

दरम्यान समृद्धी एक्सप्रेस धोत्रे, भोजडे गावाजवळून गेला. त्यावेळेस पुणतांबा मार्गे शिर्डीला जाण्यासाठी लाखगंगा गावासमोर नदी पात्रात पुलाचे काम पूर्ण केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. प्रत्यक्षात आजपर्यंत काहीही कार्यवाही झाली नाही. गोदावरी नदीवरील पुरणगाव येथील नियोजित पुलामुळे मराठवाड्यातील भाविकांना शिर्डी येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरेल तसेच नदीकाठच्या सर्व गावांच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे विशेष बाब म्हणून पुरणगाव येथील गोदावरी नदीवरील नियोजित पुलाचे काम तातडीने मंजूर करून मार्गी लावावे, असे श्री. वहाडणे यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com