
माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav
श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठ परिसरात गावोगावच्या शिवारात पूर्वी रब्बी हंगामात जिरायत ज्वारी, हरबरा, करडाई ही मुख्य पीके घेतली जात. अलीकडे सुधारित, आधुनिक अन् यांत्रिक पद्धतीने बागायत शेती वाढल्याने काही अल्पशा प्रमाणात हरबरा पीक घेतले जाते परंतू ज्वारी, करडाई ही पिके हद्दपार झाली आहे.
ट्रॅक्टर, विहीर, पाईप लाईनबरोबरच पिकासाठी बँकेकडून कर्ज पुरवठा उपलब्ध होऊ लागल्याने जिरायत जमिनीचे बारमाही व आठमाही बागायत शेतीत झपाट्याने रूपांतर झाल्याने ज्वारी, हरबरा, करडाई ही रब्बी पिके पुर्णता हद्दपार झाली आहेत. गोदाकाठ परिसरातील जमिनीचा पोत जाड अन् भारी असल्याने खरिपातील कपाशी व्यतीरिक्त दुसरी पिके घेतली जात नसे. पाण्याचा निचरा होणार्या खडकाळ व हलक्या जमिनीत खरिपातील बाजरी, मुग, भुईमूग यासारखी पिके घेतली जात.
केटीवेअर बंधार्यात आठमाही, बारमाही पाणीसाठा उपलब्ध होऊ लागल्याने गोदावरी नदीवरून गावोगावच्या शिवारात पाईपलाईनचे जाळे पसरले आहे. यामुळे जिरायत जमिनीचे बागायतमध्ये रूपांतर झाले. मुख्य ऊस लागवडीनंतर उर्वरित क्षेत्रांत खरिपातील सोयाबीन, मका, कापूस तर रब्बीत कांदा, गव्हू पिकाकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिरायत ज्वारी, करडाई, हरबरा ही पिके गायब झाली आहेत.