गोदावरी कालव्यांना 15 एप्रिलला पाणी सुटणार!

सलग दोन आवर्तनांसाठी आ. विखे पाटील आग्रही
गोदावरी कालव्यांना 15 एप्रिलला पाणी सुटणार!

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गोदावरी कालव्यांतून उन्हाळी आवर्तन येत्या 15 एप्रिलला सोडण्यात येणार आहे. 15 एप्रिल ते 15 मे असे आवर्तन असेल,

या आवर्तनालाच जोडून लगेच दुसरे आवर्तन व्हावे यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे आग्रह धरला आहे. सलग दोन आवर्तन घेण्याबाबत जलसंपदाच्या नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी सार्वमतशी बोलताना दुजोरा दिला आहे.

सिंचनाच्या दोन आवर्तनांसाठी राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला सुचविले आहे. दोन आवर्तने मिळाली तरच उभी पिके तग धरू शकतील. मात्र दोन आवर्तन घेण्यासाठी यातील पहिले आवर्तन 15 एप्रिलला सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन 15 मे पर्यंत चालल्यानंतर दुसरे आवर्तन सलग घेण्यात येणार आहे. पहिले आवर्तन ‘टेल टू हेड’ झाल्यानंतर पाणी वरवर गेल्यानंतर भरणे झाल्यानंतर पुन्हा दुसर्‍या आवर्तनासाठी पाणी टेल ला काढण्यात येणार आहे. असे नियोजन जलसंपदाचे असल्याचे समजते.

दारणा समुहातून 5.5 ते 6 टीएमसी पाणी उपलब्ध होवु शकते. 15 एप्रिलच्या आवर्तनासाठी 3.5 ते 4 टीएमसी पर्यंत पाणी लागु शकते. पहिले आवर्तन संपल्यानंतर दुसरे आवर्तन लगेचच घेतले तर उर्वरित 1.5 ते 2.5 टीएमसी पाणी या दुसर्‍या आवर्तनाला मिळु शकेल. कालवा काही अंशी ओलसर राहाणार असल्याने वहनव्य घटेल.

गहु, हरबरा ही पिके निघाली आहेत. शेतात ऊस पिक पिके उभी आहेत. फळबागा तसेच चारा पिके आहेत. तीव्र उन्हाच्या चटक्याने पिकांना पाण्याची तीव्र गरज आहे. मात्र शेतकरी वर्गाची येत्या 10 तारखे पर्यंत उभ्या पिकांना पाणी मिळावे, असा आग्रह धरत आहेत. या आवर्तनाचे नियोजन जलसंपदाने तात्काळ करावे, अशी मागणी होत आहे. उभी पिके अडचणीत आहेत.

एक्सप्रेस 10 ला सुटणार?

जलद कालव्याला काल 5 एप्रिल ला पाणी सुटणार होते. परंतु ते पुढे ढकलण्यात आले आहे. जलद कालवा 10 एप्रिल अथवा 15 एप्रिलला गोदावरीच्या दोन्ही कालव्यांबरोबर सुटू शकेल असा अंदाज आहे.

या आवर्तनातील पाणी काटकसरीने वापरा, त्यामुळे पुढील आवर्तनासाठी पाणी चांगले राहिल. पाण्याची नासाडी होणार नाही. याची सर्वांनीच काळजी घ्यावी.

- सागर शिंदे, कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com