गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी मंजूर

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी मंजूर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला गोदावरी कालव्यांची दुरुस्ती करणार असे आश्वासन आमदार आशुतोष काळे यांनी दिले होते. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून येताच दोनच महिन्यांत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी द्या, अशी मागणी केली होती.

जलसंपदा मंत्र्यांची वेळोवेळी भेट घेऊन कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी आ. काळे यांचे प्रयत्न सुरूच होते. त्या प्रयत्नांना यश मिळाले असून त्यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्र्यांनी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 14 कोटी रुपये दिले असून पुन्हा 26 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. अशा प्रकारे 40 कोटी रुपये निधी मिळाला असून अजूनही 44 कोटी रुपये लवकरच देणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघासह निफाड, शिर्डी, राहाता तालुक्यातील अनेक गावांतील शेकडो हेक्टर शेती या व वैजापूर तालुक्यातील काही गावातील शेती शेतकर्‍यांचे भवितव्य या कालव्यांवर अवलंबून आहे. उजवा कालवा नांदूर-मध्यमेश्वर बंधार्‍यापासून 110 किलोमीटरपर्यंत व डावा कालवा 90 किलोमीटरपर्यत वाहत आहे. 100 वर्ष झालेल्या कालव्यांमध्ये झाडे-झुडुपांचे साम्राज्य वाढलेले आहे. या गोदावरी कालव्यांवरील छोटे पूल, एस्केप बंधारे, मोर्‍यांची बांधकामे मोडकळीस आलेली असून त्यामुळे कालव्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. 677 क्युसेकने वाहणार्‍या उजव्या कालव्याला धरणातून 500 क्युसेक्स व 379 क्युसेकने वाहणार्‍या डाव्या कालव्याला 150 क्युसेक पाणी जास्त होत असून अनेकवेळा हे कालवे ठिकठिकाणी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

त्यामुळे त्याचा परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनावर होत असतो. या गोदावरी कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर सहकारी साखर कारखाने, छोटे-मोठे उद्योग, अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना व निफाड, कोपरगाव, शिर्डी, राहाता या मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन अवलंबून आहे. कालवे जीर्ण झाल्यामुळे कालवे फुटून आवर्तन विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम या शहरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर होत होता. त्याचा परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनावर देखील होत होता. ही बाब आमदार आशुतोष काळे यांनी गांभीर्याने घेऊन या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळविण्यासाठी सातत्याने जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करीत होते.

त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळत असून 26 कोटी रुपये गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी दिले आहेत. जीवघेण्या करोना संकटात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देताना अडचणी येत असताना देखील निधी मिळाला ही लाभधारक शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे. या निधीतून कालव्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी हा निधी वापरण्यात येणार असून अजूनही निधी मिळविण्यासाठी आपले प्रयत्न यापुढेही सुरूच राहणार असून पिण्याचे पाणी, शेती व शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com