गोदावरी उजवा व डावा कालवा नुतनीकरणास 13 कोटींचा निधी मंजूर

आ. विखेंचा पाठपुरावा, उजवा 7 कोटी 3 लाख तर डाव्या कालव्याला 6 कोटी 2 लाख
गोदावरी उजवा व डावा कालवा नुतनीकरणास 13 कोटींचा निधी मंजूर

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गोदावरीच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या नुतनीकरणास 13.5 कोटी रुपयांचा निधी राज्यसरकारने मंजुर केला आहे,

अशी माहिती राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा गोदावरीच्या कालव्यांच्या नुतनीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करत आले आहेत. टप्प्या टप्प्याने हा निधी सरकारकडून मंजूर केला जात आहे. गोदावरीचा उजवा कालवा नांदुरमधमेश्वर बंधार्‍यापासून 110 किमी लांबीचा तर डावा कालवा 90 किमी अंतराचा आहे.

गोदावरीच्या दोन्ही कालव्यांच्या जुन्या बांधकामांना 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालव्यांची कामे 1911 ते 1916 या दरम्यान ब्रिटीश आमदानीत पूर्ण झाली आहेत. गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याद्वारे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड व येवला या तालुक्यांतील तसेच नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या तालुक्यातील मिळून 33170 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळतो.

कालव्यांवरील कामे जुनी झाल्याने मोठ्या प्रमाणात गळती होते. त्यासाठी कालव्यांचे मजबुतीकरण व दुरुस्ती करणे यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत गोदावरीच्या उजव्या तसेच डाव्या कालव्यांवरील नुतनीकरणासाठी त्यात आरसीसी पाईपयुक्त मोरीच्या बांधकामास विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रशासकिय मान्यता सरकारने दिली आहे.

उजव्या कालव्यावरील साखळी क्रमांक 645560, 67180 व 67780 यासाठी 3 कोटी 74 लाख 57 हजार 453 रुपये, साखळी क्रमांक 36800, व 41750 या क्रमांका नजीक आरसीसी पाईप युक्त मोरीच्या बांधकामास 3 कोटी 28 लाख 47 हजार 478 इतका निधी मंजूर झाला आहे.

डाव्या कालव्यावरील साखळी क्रमांक 19020, 19910 यासाठी 3 कोटी 19 लाख 79 हजार 636 इतका निधी, तसेच डाव्या कालव्यावरील साखळी क्रमांक 10450, 11250, 11940 मी आरसीसी पाईप युक्त मोरीचे बांधकामास विशेष दुरुस्ती अंतर्गत 3 कोटी 1 लाख 40 हजार 643 निधी मंजूर करण्यात आला आहे. उजव्या कालव्यासाठी 7 कोटी 3 लाख 4 हजार 478 इतका निधी तर डाव्या कालव्यासाठी 6 कोटी 2 लाख 1279.5 इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

गोदावरीच्या उजव्या कालव्यावरील वेळापूर, शहाजापूर, सावळीविहीर, कनकुरी या ठिकाणच्या बांधकामास हा निधी मंजूर झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण कालव्यांच्या नुतनीकरणास निधी मिळावा यासाठी आग्रह धरला होता. शासनाने हा निधी मंजूर केला आहे.

दिवंगत पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी त्या काळात नाबार्डकडून 75 कोटींचा निधी मंजूर करवून घेतला होता. आताही आपण मागणी केली होती. टप्प्या टप्प्याने कालव्यांवरील जीर्ण झालेली कामे होतील,असेही आमदार विखे पाटील म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com