गोदावरी कालव्यांच्या आवर्तनाचे नियोजन होईल का ?

धरणे तुडूंब, जायकवाडीला पाणी सोडण्याची चिंता मिटली
गोदावरी कालव्यांच्या आवर्तनाचे नियोजन होईल का ?

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

समन्यायी कायद्याचा विचार करता जायकवाडी धरणात 65 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा झाला. काल सायंकाळी जायकवाडी 82 टक्क्यांवर पोहचले होते. आता उर्ध्व धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ येणार नाही. धरणेही फुल्ल झाली, आता गोदावरी कालव्यांचे सिंचनाच्या आवर्तनाचे वर्षभरातील व्यवस्थापन नाशिक या जलसंपदा विभागाने करण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज पडली नाही. धरणात मुबलक पाणी होते. परंतु जलसंपदा विभागाने नियोजन न केल्याने गोदावरीच्या लाभक्षेत्रातील सिंचनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले होते. याचा मोठा फटका लाभक्षेत्रातील शेतीला आणि शेतकर्‍यांना बसला!

गोदावरीच्या दोन्ही कालव्यांची सिंचन व्यवस्था अलिकडच्या काही वर्षात पुर्णत: कोलमडल्याचे दिसुन येते. पिके सुकून चालली तर त्यावेळी पाणी मिळत नाही. उशीराने आवर्तन दिले जाते. मागील हंगामात हा अनुभव शेतकर्‍यांनी घेतला. तब्बल 15 ते 20 दिवसांनी आवर्तन उशीराने मिळाले. 15 ऑक्टोबर नंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होते. त्यात नियोजन व्हायला हवे. शेतकर्‍यांना पाणी आवर्तनाच्या तारखा द्यायला हव्या मात्र तसे घडतांना दिसत नाही. पाणी मिळण्याची शाश्वती नसल्याने अनेक फळबागांवर कुर्‍हाड चालविण्याची वेळ आली. बागांचे क्षेत्र घटले. उसाचे क्षेत्र घटले.

जायकवाडीला पाणी न सोडून सुध्दा, रब्बी एक व उन्हाळ्यात दोन, आवर्तनाच्यावर पाणी मिळू शकत नाही. यात प्रभावी सिंचन व्यवस्थापनाचा अभाव दिसतो. सर्वसाधारण विषय असा आहे की, एखाद्या कामाचा नियमित आढावा आणि चुकीसाठी जाब विचारला जात असेल, तर आणि तरच प्रशासकिय यंत्रणा काम करते!

जलसंपदाच्या टॉप पासून बॉटम पर्यंत कुणीच अधिकारी, कर्मचारी गांभिर्याने घेत नसल्याचे जाणवते. लाभक्षेत्रात कुणाचीच उपस्थिती नसते, ना वास्तव्य असते. सारा मोबाईल कार्यक्रम झाला आहे. किती मागणी क्षेत्र, किती भिजले, शिल्लक किती, दैनंदिन पाणी वापर किती, झालेला पाणी वापर किती, शिल्लक पाणी किती, निमताना याबाबत कुणालाच कधी माहिती घ्यावी वाटत नाही. सर्व काम रामभरोसे चालू आहे. मुळात काय असते, काय बघायचे याचीच माहिती कुणाला नाही किंवा जाणून घ्यायची इच्छा नाही. तीन वर्षाचा कोरडा कार्यक्रम. त्यात कसलीही भावनिक गुंतवणूक नसते. या साखळीतील सार्‍यांचीच अशी धारणा असेल तर मग विषयच संपला!

सिंचन व्यवस्थापनात फक्त आवर्तन यशस्वी करणे हा दृष्टिकोन असण्याऐवजी, हंगाम यशस्वी करणे, हा दृष्टिकोन असावा लागतो. नजर कायम ऑक्टोबर ते मे पर्यंतच्या एकात्मिक नियोजनावर ठेवली पाहिजे. अलीकडे दुर्दैवाने आवर्तनात भरमसाठ पाणी सोडून ते यशस्वी केले जाते आणि हार तुरे घेऊन पेपरला बातम्या देऊन डांगोरा पिटला जातो. पहिल्या दोन तीन आवर्तनात पाण्याचा रतीब घालून, नंतर पाणी संपले म्हणून हात वर केले जातात. आणि हंगाम हमखास फेल केला जातो. पिकांचा मोसम टाळून पाणी दिल्याचा शो केला जातो. यात सरासरी उत्पादन घटून शेतकरी आतबट्यात जातो.

अर्थात हे मिसमॅनेंजमेंट मुळे झालेले नुकसान सरकार दप्तरी नोंदले जात नाही. ही खरी शोकांतिका आहे. धरणे 100 टक्के भरली तरी पाणी मिळण्याबाबत विश्वासार्हता न राहिल्याने, पुर्वीच्या बागायती क्षेत्राला, जिरायतीचे स्वरुप आले आहे. सध्या पाण्याची नाही पण पाणीपट्टीची विश्वासार्हताच फक्त शिल्लक राहिली आहे! आहे ते भांडवल पीक उभे करण्यात घालवायचे. अन् पाणी असूनही ते वेळीच न दिल्याने जळणारे पिक उघड्या डोळ्यांनी बघून कर्जबाजारी व्हायचे, असा हा वार्षिक कार्यक्रम सध्या चालू आहे. शेती पडीत ठेवली तर हातचे भांडवल तरी जाणार नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शेतकरी भरडला जातोय !

गोदावरीच्या दोन्ही कालव्यावर सन 2000 च्या दरम्यान साधारणपणे रब्बीत दहा ते बारा हजार आणि उन्हाळ्यात पाच हजार हेक्टर क्षेत्राची (ब्लॉक व नमुना सात) मागणी असायची. एका आवर्तनात रब्बीत जवळपास 2200 आणि उन्हाळ्यात 2700 दलघफू पाणी वापर होत असे. रब्बीत दोन आणि उन्हाळ्यात दोन किंवा तीन आवर्तने होत असत. आज तर फळबागा संपुष्टात आल्या आहे. मागणी क्षेत्रात जवळपास तीस टक्के घट झाली आहे. परंतु आवर्तनातील पाणी वापर रब्बीत 3000 आणि उन्हाळ्यात 4200 पर्यंत पोहचला आहे. हे अकार्यक्षम सिंचन व्यवस्थापनाचे लक्षण आहे. त्याचा परिणाम म्हणून जायकवाडीला पाणी न सोडताही तीन आवर्तनाच्यावर मजल जात नाही. त्यामुळे अस्मानीबरोबरच सुलतानीनेही शेतकरी भरडला जातोय, अशी परिस्थिती आहे. यात वेळीच सुधारणा न झाल्यास, हे जनक्षोभाला आमंत्रण ठरेल. तेंव्हा याची सर्वच पातळीवर गांभीर्याने नोंद घेणे आवश्यक असल्याचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग उत्तमराव निर्मळ यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.