कोपरगाव (प्रतिनिधी) -

गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला 13 एप्रिलपासून एकाचवेळी दोन्ही उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला

असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. तसेच शंभरी पार केलेल्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पहिल्या टप्प्यातील 13 कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व बाजूस कोणत्याही प्रकारचे बंधारे न बांधणेबाबत जलसंपदा विभागाने काढलेला आदेश शिथिल करणेबाबत व कोपरगाव तालुक्यात बंधारे बांधण्यास परवानगी मिळणेबाबत विचारविनिमय करणेबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आ.काळे यांनी गोदावरी डाव्या उजव्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील सिंचनासाठी तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली. 13 एप्रिलपासून डाव्या व उजव्या कालव्याला एकाचवेळी दोनही उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत आ.काळे यांनी मंजूर बंधार्याचे काम पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत आग्रह धरला तसेच मतदार संघामध्ये बंधारा कम पूल बांधण्याची मागणी केली. यामध्ये वडगाव कानळद, मंजूर, माहेगाव देशमुख, हिंगणी, डाऊच खुर्द, सडे, शिंगवे व पुणतांबा याठिकाणी बंधारा कम पूल बांधल्यास पावसाळ्यात पाणी साठविले जाऊन त्या पाण्याचा उन्हाळ्यात सिंचनासाठी उपयोग होऊन त्याचा मोठा फायदा नागरिकांना होणार असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.

गोदावरी कालव्यांचे मजबुतीकरण अथवा नव्याने बांधकाम करणे गरजेचे असून त्यासाठी 600 कोटी रुपये निधी मिळावा अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केलेली आहे. त्यापैकी 78 कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल करण्यात आलेले आहेत. त्या प्रस्तावांपैकी या बैठकीत डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यातील 13 कोटी 05 लाख 86 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. व पुढील निधी देखील तातडीने उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री ना.पाटील यांनी दिली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.