गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पाणी सुटले !

नदीत 39338 क्युसेकने विसर्ग, जायकवाडी 75 टक्क्यांवर
File Photo
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

जायकवाडीची ओटी भरली... अन मागणी फळाला आली. जायकवाडीने पासष्टी ओलांडली आणि गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना काल सकाळी 8 वाजता बिगरसिंचनासाठी पाणी सोडले आहे. गोदावरी नदीत काल 23451 क्युसेकपर्यंत कमी केलेला विसर्ग काल सायंकाळी 6 वाजता पुन्हा 39338 क्युसेकने करण्यात आला. खाली जायकवाडी जलाशयात 75 टक्के पाणीसाठा झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात परवा पावसाचा जोर ओसरला होता. परंतु काल पुन्हा दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी परिसरात पावसाने पुन्हा आगमन झाल्याने नवीन पाण्याची आवक वाढत आहे. गंगापूरच्या पाणलोटातही काल मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. काल सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत कश्यपीला 40, गौतमीला 12, गंगापूरला 19 , त्र्यंबकला 19, अंबोलीला 23 मिमी पावसाची नोंद झाली.

काल सायंकाळच्या आकडेवारी धरणातून करण्यात येणारे विसर्ग असे- दारणा 4034 क्युसेक, कडवा 647 क्युसेक, वालदेवी 241 क्युसेक, गंगापूर 1377 क्युसेक, आळंदी 447 क्युसेक, भोजापूर 540 क्युसेक आणि पालखेड 14000 क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. काल गोदावरीत सकाळी 6 वाजता 28053 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. सकाळी 9 वाजता 23451 क्युसेक इतका करण्यात आला. तर दुपारी 3 वाजता त्यात काहीशी वाढ होऊन तो 28170 क्युसेक इतका करण्यात आला. तर सायंकाळी 6 वाजता तो वाढवत 39338 क्युसेक इतका करण्यात आला. पालखेड धरणातील विसर्ग वाढल्याने गोदावरीतील विसर्ग वाढविण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढला की धरणातील विसर्ग वाढू शकतो. पर्यायाने गोदावरीतील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन पडणारा जायकवाडीच्या दिशेने वाहाणारा विसर्गही वाढ शकतो.

खाली जायकवाडीला काल सोमवारी सायंकाळी 6 वाजता 33 हजार 620 क्युसेक ने पाण्याची आवक होत होती. त्यामुळे काल काल सायंकाळी जलाशयातील साठा 74.60 टक्क्यांवर पोहचला होता. उपयुक्तसाठा 57.2 टीएमसी इतका झाला होता.

काल सोमवारी सकाळी 8 वाजता गोदावरीचे दोन्ही कालवे नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून सोडण्यात आले आहेत. गोदावरीचा उजवा कालवा 200 क्युसेकने तर डावा कालवा 100 क्युसेकने सोडण्यात आला आहे. हे पाणी बिगर सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व कोपरगाव च्या माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी तशी मागणी जलसंपदा कडे केली होती. लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अल्प असल्याने दोन्ही कालव्यातुन सोडलेल्या विसर्गामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्याही क्षणी विसर्ग सोडणार

जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे परिचलन सुचीनुसार आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करावयाचे असल्याने अशीच आवक चालू राहिल्यास नजीकच्या काळात धरणाच्या गेटमधून/सांडव्याद्वारे गोदावरी नदीमध्ये पूरपाणी सोडावे लागणार असल्याने गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांनी सतर्कता बाळगावी म्हणून संबंधित गावांना सावधनतेचा इशारा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com