गोदावरी उजवा व डाव्या तट कालव्यांचे नूतनीकरण कामासाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील

गोदावरी उजवा व डाव्या तट कालव्यांचे नूतनीकरण कामासाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील

शिर्डी|प्रतिनिधी| Shirdi

शंभर वर्षापुर्वीच्या गोदावरी उजवा व डाव्या तट कालव्यांचे नूतनीकरणाच्या कामांसाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश करण्यात यावा अशी मागणी खा. सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे करताच संबंधित पत्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी करून हिरवा कंदील दाखवला आहे. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश दिले असल्याची माहिती खा.लोखंडे यांनी दिली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गोदावरी उजवा व डाव्या कालव्याच्या नुतनीकरणांसंदर्भात पत्राद्वारे केलेल्या मागणीत म्हटले आहे, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राहाता व कोपरगाव तालुक्यातील गोदावरी उजवा व डाव्या तट कालव्यांचे व चार्‍यांचे कामे सुमारे शंभर वर्षांपूर्वी झालेले आहेत. परंतु इतके वर्ष होऊनही कालवा व चार्‍यांची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. कालवा व चार्‍या गाळ मातीने भरलेले आहेत. बर्‍याच ठिकाणी फुटलेले आहे. त्यामुळे कालव्यांचे पाणी इतरत्र वाया जाते. पर्यायाने टेलपर्यंत पाणी जात नाही. म्हणून टेलच्या शेतकर्‍यांना सिंचनाची मोठी समस्या निर्माण होत आहे.

या कालव्यांचे व चार्‍यांचे नूतनीकरण केल्यास गोदावरी उजवा, डावा तट कालव्यांखालील शेतकर्‍यांच्या शेती सिंचन आणि टेल टँक भरण्यात मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. तरी गोदावरी उजवा व डाव्या तट कालव्यांचे नूतनीकरणांबाबत बैठकीचे आयोजन करण्यासंबंधीत अधिकार्‍यांना आदेश करण्यात यावे असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मंजुरी देत बैठकीचे आयोजन करावे असा आदेश पाटबंधारे विभागाच्या केला आहे. त्यामुळे शंभर वर्षापुर्वीच्या कालव्यांची नुतनीकरणाची कामे जलदगतीने झाल्यास गोदावरी उजवा व डाव्या तट कालव्यांचे पाणी टेलपर्यत सहजासहजी पोहोचले जाईल. शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल असा विश्वास खा.लोखंडे यांनी व्यक्त केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com