श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कोपरगाव-राहाता व श्रीरामपूर तालुक्यातील टेल भागासाठी वरदान असलेल्या गोदावरी कालव्याच्या

पाटपाण्याचे सुयोग्य नियोजन व आवर्तनांची निश्चिती न झाल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही आवर्तनाचा फज्जा उडाला आहे.

उन्हाळी हंगामात आवर्तन लवकर घेणे गरजेचे आहे. उन्हाचा पारा 40 अंशांवर गेल्याने पिके करपू लागली आहेत. परिणामी, विहिरींनी तळ गाठला. अशा अवस्थेत सर्वच लोकप्रतिनिधी राजकारणात गर्क व अधिकारी करोनाच्या नावाखाली निष्क्रीय झाल्याने उन्हाळी आवर्तनास उशीर होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम यांनी केला आहे.

दरवर्षी धरण समुहात मर्यादित पाणीसाठा असल्याने आवर्तन देण्यासाठी ओढाताण होत असते. मात्र यंदा धरण पाणलोट क्षेत्र व लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस होवूनदेखील मार्च -एप्रिल महिन्यामध्ये विहिरींनी तळ गाठला. अशा अवस्थेत तालुक्यातील ऊस, फळबागा व चारापिकांना पाण्याची नितांत गरज आहे. तरीही आवर्तनास उशीर होत असल्याने शेतकर्यांना चिंता लागून आहे.

राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी त्याकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने आवर्तन सोडावे, अन्यथा शेतकरी संघटना पाटबंधारे विभागाच्या राहाता उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा विलास कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

जलसंपदा विभागाने 2020 पासून सात नंबर पाणीअर्जाद्वारे पाटपाण्याचे दर तीनपटीने वाढविल्यामुळे शेतकरी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची लवकरच भेट घेऊन पाणीपट्टीचे दर कमी करण्याची मागणी करणार असल्याचे विलास कदम यांनी सांगितले.