गोदावरी कालव्यांचे जून मध्येही आवर्तन घ्या - ना. विखे पाटील

गोदावरी कालवा सल्लागार समितीची मुंबईत बैठक
गोदावरी कालव्यांचे जून मध्येही आवर्तन घ्या - ना. विखे पाटील

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गोदावरीच्या कालव्यांवर रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामात पाणी बचत करुन जूनमध्ये एक आवर्तन घ्या, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री तथा नगर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

काल उन्हाळा हंगाम नियोजनासाठी दारणा प्रकल्प (गोदावरी कालवे) कालवा सल्लागार समितीची बैठक पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन मुंबई येथे पार पडली. या बैठकीस श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, कार्यकारी अभियंता तथा अधीक्षक अभियंता व प्रशासक सागर शिंदे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 महेश गायकवाड, उपविभागीय अभियंता बी. जी. शिंदे आदी उपस्थित होते.

गोदावरी धरण समुहातील उपलब्ध पाणीसाठा बाबत माहिती अधिकारी वर्गाने सांगितली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रब्बी हंगामातील शिल्लक पाणी व उन्हाळा हंगामातील तीन आवर्तनामधील बचत केलेले पाणी उपलब्ध करुन जून मध्ये सिंचन आवर्तन घेण्याचे निर्देश अधिकारी वर्गाला दिले. उन्हाळी हंगामाचे नियोजन गांभीर्यपूर्वक करण्याचे सूचित करुन कमी कर्मचारी उपलब्ध असलेबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश दिले. सद्यस्थितीत फुटलेला गोदावरी डावा तट कालव्याचे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी व आवर्तन पूर्ववत सुरु करण्याचे सूचना ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या. गोदावरी कालव्यांबरोबरच प्रवरा कालवे, मुळा कालवे यांच्या कालवे सल्लागार समितीच्या बैठका काल मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.

डावा कालवा पुर्ववत होणार!

दरम्यान गोदावरीचा डावा कालवा दोन दिवसांपूर्वी 39 किमी अंतरात ब्राम्हणगाव शिवारात भराव तुटल्याने फुटला होता. हे काम सुरु आहे. दोन ते तीन दिवसात या कालव्याचे आवर्तन पुर्ववत सुरु होईल असे कोपरगाव विभागाचे उपअभियंता बी. जी. शिंदे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com