
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना आज सकाळी नांदूरमधमेश्वर बंधार्यातुन पाणी सोडण्यात येणार आहे. या उन्हाळी आवर्तनासाठी 25 फेब्रुवारीला दारणातुन सुरुवातीला 550 व नंतर वाढवत 1100 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे. तर काल दुपारी मुकणेतुनही 500 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत आहे.
तीव्र उन्हाच्या चटक्याने पिके सुकू लागली होती. शेतकरी पहिल्या उन्हाळी आवर्तनाची चातका सारखी वाट पाहत होते. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शेतकर्यांनी आवर्तन लवकर सोडण्याबाबत आग्रह धरला. ना. विखे यांनी जलसंपदाच्या आधिकार्यांना आवर्तनासाठी तात्काळ पाणी सोडण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
यामुळे परवा सायंकाळी 7 वाजता दारणातुन 550 क्युसेक ने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काल सकाळी या विसर्गात वाढ करुन तो 1100 इतका करण्यात आला. काल दुपारी 2 वाजता या आवर्तनासाठी मुकणे धरणातुनही 500 क्युसेक ने विसर्ग सोडण्यात आला. हे पाणी काल रात्रीतुन नांदूमधमेश्वर बंधार्यात दाखल झालेले असेल. लेव्हल सकाळ पर्यंत येवुन आज गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडले जाणार आहे.
आज सोमवारी सकाळी दोन्ही कालवे वाहते झालेले असतील. सात क्रमांकाचे पाणी मागणी अर्ज दाखल करण्याची मुदत 25 फेब्रुवारी पर्यंत होती. गोदावरीच्या उजव्या कालव्याला 760 हेक्टरची मागणी आहे. तर डाव्या कालव्यावर 650 च्या आसपास आहे. हे आवर्तन 20 ते 22 दिवस सुरु राहिल असा अंदाज आहे. उन्हाळ्यात एकूण तीन आवर्तन मिळणार आहेत. त्यातील आज सोडले जाणारे व एप्रिल व मे असे दोन असे एकूण तीन आवर्तनाचे जलसंपदाचे नियोजन आहे.