गोदावरी कालव्यांना 1 मार्चच्या आधी आवर्तन सोडा - कोल्हे

स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गोदावरी डावा व उजवा कालव्याला उन्हाळी हंगामातील आवर्तन (रोटेशन) येत्या 1 मार्चला सोडण्याचे पाटबंधारे विभागाने ठरवले आहे. मात्र सध्या रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यातील पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांचे आवर्तन लवकर सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. पाटबंधारे विभागाने शेतकर्‍यांच्या या मागणीचा विचार करून 15 फेब्रुवारीपर्यंत आवर्तन सोडावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी केली आहे.

जलसंपदा विभागाने घेतलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांना एक रब्बी व तीन उन्हाळी आवर्तन (रोटेशन) देण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 22 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे विधान भवनात गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. यावर्षी धरण क्षेत्रात भरपूर पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे रब्बी हंगामात एक आणि उन्हाळी हंगामात तीन असे चार आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी विवेक कोल्हे यांनी केली होती.

सध्या रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यातील पाण्याची नितांत गरज आहे. गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील आवर्तन ठरल्याप्रमाणे येत्या 1 मार्चला सोडण्याचे पाटबंधारे विभागाने ठरवले आहे. जर 1 मार्चला आवर्तन सोडले तर 4 मार्चपर्यंत पाणी खालपर्यंत येईल आणि हे आवर्तन पाच दिवस पिण्याच्या पाण्यासाठी जाईल. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळणार नाही. शेतकर्‍यांच्या हातात कोणतेही पीक लागणार नाही.

ही बाब लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांना 1 मार्चला आवर्तन सोडण्याऐवजी त्याच्या अगोदर आवर्तन सोडावे. शेतकर्‍यांच्या या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांना नियोजित तारखेच्या आधी 15 फेब्रुवारीच्या आत आवर्तन सोडावे, अशी मागणी स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com