गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक रखडली !

गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक रखडली !

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गोदावरी कालव्यांच्या रब्बी तसेच उन्हाळी आवर्तनाच्या नियोजनासाठी होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक नाशिक चे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या तारखे वाचुन अडली आहे. जलसंपदाने पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडे तारीख मिळावी यासाठी पत्र दिल्याचीही माहिती समजली आहे. नाशिक चे पालकमंत्री हे कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष असतात. लवकरात लवकर त्यांची भेट घेवून बैठक निश्चित करु असे जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी सांगितले. आठ ते 15 दिवसात ही बैठक होईल असा अंदाज आहे.

गोदावरी कालव्यांच्या रब्बी तसेच उन्हाळी आवर्तनाच्या नियोजनासाठी अद्याप कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नाही. साधारणत: 15 आक्टोबर नंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होवुन त्यात रब्बी तसेच उन्हाळी आवर्तन किती व ते कधी मिळणार? याचे नियोजन केले जाते. मात्र जलसंपदा अथवा मंत्री पातळीवर या बैठकीचे नियोजन अद्याप झालेले नाही. जलसंपदाने रब्बीच्या नियोजनासाठी पाणी मागणीचे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर पर्यंत ठेवली होती.

या कालावधीत गोदावरी उजव्या कालव्यावर 1295.75 हेक्टर क्षेत्राला पाणी मागणी आली. तर गोदावरी डाव्या कालव्यावरील लाभधारकांनी 1487.77 हेक्टर क्षेत्राला मागणी आली. अशी एकूण 2783.52 हेक्टरला दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील क्षेत्राला पाण्याची मागणी आली आहे. मात्र ही मागणी सरासरी दोन्ही कालव्यावर 500-500 हेक्टरने कमी आली आहे. आता पुन्हा दोन्ही कालव्यांच्या राहिलेल्या लाभधारकांसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान गोदावरीच्या दोन्ही कालव्यांवरील रब्बी तसेच उन्हाळी आवर्तनाच्या तारखा निश्चितीसाठी कालवा सल्लागार समितीची बैठक 15 आक्टोबर नंतर घेण्याचा प्रघात आहे. परंतु अद्याप या बैठकीला मुहर्त मिळालेला नाही. रब्बी हंगामाचे नियोजन करण्यासाठी सिंचन आवर्तनाचे वेळापत्रक कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम होणे गरजेचे आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणे गरजेचे आहे. कारण सिंचन आवर्तन वेळापत्रक आणि विहिरीतील पाण्याची सक्षमता विचारात घेऊन कोणते पिक घ्यायचे, किती क्षेत्रावर घ्यायचे तसेच त्याअनुषंगाने शेतीची मशागत पेरणी इत्यादी कामे शेतकर्‍याला हाती घ्यावी लागतात.

परंतु सिंचन आवर्तन कार्यक्रम वेळेत जाहीर केला गेला नाही, तर रब्बी हंगामाचे सुयोग्य नियोजन करणे मुष्कील होते. विलंब झाल्याने रब्बी हंगामातील सरासरी उत्पादनात घट येते. कालवा सल्लागार समितीची बैठकीत आवर्तनाच्या तारखा निश्चित होते. सर्वसाधारण रब्बीचे पहिले आवतर्र्न डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात दिले जाते. मात्र पालकमंत्र्यांची तारखे विना कालवा सल्लागार समितीची बैठक रखडली असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान कालवा सल्लागार समितीची बैठक घेणार आहोत. पालकमंत्री यांच्या तारीख मिळाली की बैठकीचे आयोजन करु, साधरत: आठवडाभरात याबाबत निर्णय होईल. असे सार्वमतशी बोलतांना जलसंपदा विभगाचे कार्यकारी संचालक सागर शिंदे यांनी सांगितले.

ज्या शेतकर्‍यांनकडे पाणी पट्टी थकित आहे. त्यांनी ती भरावी असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.

सात नंबरची मुदत वाढली !

राज्यातील सन 2021-22 च्या रब्बी हंगामासाठीच्या सात क्रमांकाच्या पाणी मागणी अर्ज स्विकारण्याची जलसंपदा विभागाने मुदत वाढ दिली आहे. आता लाभधारक शेतकर्‍यांना 30 नोव्हेंबर पर्यंत पाणी मागणी अर्ज दाखल करता येतील. तसे जाहिर प्रकटन जलसंपदाने 18 नोव्हेंबरला काढले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com