गोदावरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळाला

गोदावरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळाला

सोमवारी दोन्ही कालव्यांच्या स्वतंत्र बैठका

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गोदावरी कालव्याचे रब्बी व उन्हाळ आवर्तनाच्या नियोजनासाठी गोदावरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त मिळाला असून आता ही बैठक सोमवार दि. 29 नोव्हेंबर रोजी होत आहे.

उजवा तसेच डावा कालव्यांच्या स्वतंत्र बैठका होत आहेत. गोदावरी उजव्या कालव्याची कालवा सल्लागार समितीची बैठक आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राहाता येथील इरिगेशन बंगल्यात सोमवारी दि. 29 रोजी दुपारी 3.30 वाजता होत आहे तर गोदावरी डाव्या तट कालव्याची सल्लागार समितीची बैठक कोपरगाव येथे सोमवार दि.29 रोजी सकाळी 10 वाजता कृष्णाई मंगल कार्यालयात कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

कालवा सल्लागार समितीची बैठक यावर्षी तीन आठवडे उशिराने होत आहे. ही बैठक नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रोटोकॉल प्रमाणे होणार होती. परंतु त्यांनीच जलसंपदाला पत्र देऊन गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक संबंधित लोकप्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली घेण्याच्या सूचना नाशिक जलसंपदाच्या अधिक्षक अभियंता तथा कालवा सल्लागार समिती सदस्य सचिव अलका आहिरराव यांना दिल्या. त्यानुसार श्रीमती अहिरराव यांनी कोपरगावची बैठक आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली तर उजव्या कालव्याची बैठक राहाता येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हावी यासाठी संपर्क करून या दोन्ही बैठका एकाच दिवशी सोमवारी वेगवेगळ्या वेळेत घेण्यात येत आहेत.

गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकर्‍यांची सातत्याने हेळसांड होत आहे. जायकवाडीचे समन्यायी पाणी वाटपाचे भूत मानगुटीवर बसले आहे. पावसाळ्यात जायकवाडी 65 टक्के कधी होते? ही काळजी असते अन् इकडून तिकडून जायकवाडी भरले तर गोदावरी कालव्याच्या पाण्याचे नियोजनातील ढिसाळपणा होतो. यामुळे लाभधारक शेतकरी वैतागले आहेत. यामुळे शेतकरी पीक पद्धती बदलण्याच्या मानसिकतेत आहे. किंबहुना ती बदलेली आहेत. धरणे पूर्ण क्षमतेने भरूनही उन्हाळ्यात वेळेत पाणी मिळत नाही. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसतो. रब्बीत 2 तर उन्हाळ्यात 3 आवर्तने मिळावीत. त्यांचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा संबंधित लोकप्रतिनिधी आणि जलसंपदाकडे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com