
नाऊर |वार्ताहर| Naur
श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पट्ट्यात खरीप हंगामात प्रामुख्याने घेतले जाणारे कपाशी, सोयाबीन, मूग, बाजरी, मका आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. अद्याप अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून वरुण राजाची वाट पाहत असल्याचे चित्र नाऊर, रामपूर, जाफराबाद, सराला-गोवर्धन, नायगाव, माळेवाडी, उंदिरगाव परिसरात दिसत आहे.
यंदा अपेक्षापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागासह पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहेे. त्यानुसार गोदावरी पट्ट्यातील बहुतांशी शेतकर्यांनी या भागात कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. कपाशीसह सोयाबीन, बाजरी, मका, मूग आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. मात्र जून महिना संपूनही अद्याप पाहिजे तेवढा पाऊस न पडल्याने बळीराजा ढगाकडे डोळे लावुन बसला आहे. गेल्या महिनाभरापूर्वीच शेतीची सर्व मशागतीसह इतर सर्व कामे उरकण्यात आली होती.
थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकर्यांमध्ये काही अंशी आनंद दिसत होता. बर्याच शेतकर्यांनी घाई गडबडीने मशागतीच्या मोठ्या खर्चानंतर हजारो रुपयांचे बियाणे खरेदी करून मातीमध्ये गाडले. मात्र त्यानंतर पावसाचा थेंबही न पडल्याने शेतकर्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही बागायतदार शेतकर्यांनी शेतीतील पिकांना वाचवण्यासाठी पाणी देण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. मात्र या भागातील जिरायत शेतकरी हवालदिल झाला असून आठवडाभरात पाऊस पडला नाही तर ही पिके जळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पुन्हा दुबार लागवड किंवा पेरणीचे संकट शेतकर्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे बळीराजाला नव्याने मोठ्या खर्चाला देखील सामोरे जावे लागू शकते.