
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणार्या गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांच्या अर्थकारणाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी केले.
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित गोदाकाठ महोत्सव 2023 चे उद्घाटन पुष्पाताई काळे यांच्या हस्ते व आ. आशुतोष काळे व चैतालीताई काळे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाने हजारो बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. यापुढे देखील ही सामाजिक बांधिलकी जोपासण्याची जबाबदारी पार पाडणार असून गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांचा मुख्य आधारस्तंभ झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
चैतालीताई काळे म्हणाल्या, बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे व्रत हाती घेतलेल्या या गोदाकाठ महोत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना 2020 ला 200 च्या आत असलेले बचत गटाच्या महिलांच्या स्टॉल्सची संख्या 300 पर्यंत जावून पोहोचली असून यावरुन गोदाकाठ महोत्सवाने घेतलेल्या भरारीतून निश्चितपणे बचत गटाच्या महिलांची आर्थिक प्रगती झाल्याचे अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, संलग्न संस्थांचे पदाधिकारी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.