शेतकर्‍याच्या गोठ्यातून 27 शेळ्यांची चोरी

पाळीव जनावरे चोरणार्‍या टोळीचा नगर तालुक्यात धुमाकूळ
चोरी
चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकर्‍याच्या गोठ्यातून 27 शेळ्या चोरून नेल्या आहेत. नगर तालुक्यातील कोल्हेवाडीत सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी बाळासाहेब मोरचुद भोसले (वय 45 रा. कोल्हेवाडी) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यात गावागावांत शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांच्या चोर्‍या होण्याचे सत्र गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सुरूच आहे. शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांच्या वाढत्या चोर्‍या पाहता या चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान नगर तालुका पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. शेतकर्‍यांची पाळीव जनावरे रात्रीच्यावेळी गोठ्यातून चोरून नेणार्‍या टोळ्या धुमाकूळ घालत आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या जर्सी गायी, खिलार बैल, शेळ्या-मेंढ्या आतापर्यंत चोरीला गेल्या आहेत.

कोल्हेवाडी शिवारात डोंगराच्या कडेला असलेल्या भोसले वस्तीवरील शेतकरी बाळू भोसले यांच्या घराशेजारील बंदिस्त गोठ्यातून चोरट्यांनी 27 शेळ्या चोरून नेल्या आहेत. भोसले हे सकाळी सहाच्या सुमारास झोपेतून उठल्यावर त्यांना शेळ्या चोरीला गेल्याची माहिती समजली. त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक ए.ई.सय्यद करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com