जागतिक पातळीवर साखरेचे भाव वधारले

साखर कारखान्यांचा आर्थिक बोजा होणार कमी
जागतिक पातळीवर साखरेचे भाव वधारले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेली पाचपेक्षा अधिक वर्षे सातत्याने वाढलेल्या तोट्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला यंदा चांगले दिवस येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जागतिक स्तरावर साखरेचे भाव वधारल्याने साखर उद्योगाला दिलासा मिळणार असून यामुळे साखर कारखान्यांचा आर्थिक बोजा कमी होवून शेतकर्‍यांच्या उसाला एफआरपीनूसार भाव देण्यासोबतच पूर्व हंगामासाठी पैसा उपलब्ध होणार आहे. यामुळे कारखान्यांना दरवर्षाप्रमाणे पूर्वहंगाम कर्जासाठी बँकांची पायरी झिजवावी लागणार नाही, अशी चिन्हे आहेत.

गेल्या महिनाभरापासून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत आहेत. जुन महिन्यांत साखरेचा दर 407 प्रती डॉलर होता. त्यात वाढ होवून हा दर आता 547 प्रती डॉलरपर्यंत पोहचला आहे. यामुळे भारतातील आणि महाराष्ट्रातील साखरेला 3 हजार 300 ते 3 हजार 400 रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे. देशातून आतापर्यंत 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली असून अद्याप 10 लाख मेट्रिक टन साखरेची जागतिक स्तरावर मागणी आहे. यासाठीचे सौदे सुरू झाले असून यातून साखर कारखान्यांची आर्थिक गाडी रुळावर येण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी दर कमी होते आणि साखर गोडाऊनमध्ये पडून होती. यामुळे कारखान्यांवर व्याजाचा बोजा वाढला होता. मात्र, गोडावूनमध्ये पडून असलेल्या साखरेला आता खुल्या बाजारात 3 हजार 300 रुपये प्रती क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. तसेच करोनामुळे बंद असणारा बाजार पूर्णवेळ खुला झाल्याने उलाढाल वाढली आहे.

भारतासह महाराष्ट्रात सणासुदीचा कालावधी सुरू झाला असून गौरी-गणपतीपासून त्यास सुरूवात होणार असल्याचे साखरेचे भाव 3 हजार 500 रुपये प्रती क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक वधारण्याची शक्यता आहे. यामुळे साखर कारखानदारी समोरील आर्थिक अनिष्ठता संपण्यास मोठी मदत होणार आहे. केंद्र सरकारने साखरेच्या दराबाबत निर्णय घेतला नसला तरी खुल्या बाजारात साखरेचा दर वाढल्यामुळे कारखान्यांना जास्तीचे पैसे मिळणार असल्याचे मत साखर उद्योगातील अभ्यासक अनंत निकम यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना व्यक्त केले.

केंद्र सरकारने नवीन हंगामासाठी साखर निर्यातीवर देण्यात येणारी सबसिडी परत घेणार असल्याचे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या हंगामात निर्यात अनुदान मिळणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किंमतीत वाढ होत असल्याने आता सबसिडीची आवश्यकता नसून त्याचा फटका निर्यातदारांना बसणार आहे. तसेच जागतिक बाजारपेठे सातत्याने सबसिडी देऊ नये, याबाबत तक्रारीचा सूर लावला आहे. भारत हा जगातील दुसरा मोठा साखर उत्पादक देश असून दुसरे पुरवठादार भारताच्या साखर निर्यात सबसिडीला विरोध करत आहेत.

मागील वर्षी साखरेला 2 हजार 900 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला होता. त्यात यंदा 400 रुपयांची वाढ झाली असून यामुळे साखर कारखान्यांना शेतकर्‍यांना एफआरपीनूसार 14 दिवसांत दर देता येणार आहेत. यासह कर्मचार्‍यांचे पगार, कारखान्यांच्या देखभाल दुरूस्तीसह पूर्व हंगाम कर्जाचा प्रश्नावरही मात करता येणार आहे.

मागील हंगामातील स्थिती

राज्यात 95 खासगी आणि 95 सहकारी कारखान्यांनी दररोज 7 लाख 28 हजार मेट्रीक टनानूसार मागील हंगामात 1 हजार 63 हजार लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले. त्यातून 1 हजार 63 लाख क्विंटली साखरचे उत्पादन केले. गाळपाचे सरासरी दिवस हे 140 तर कमी कमी 29 दिवस होता.

दहा वर्षातील प्रगती

दहा वर्षापूर्वी राज्यातील साखर उद्योगाने 2011-12 या आर्थिक वर्षात 7 लाख 71 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले होते. त्यातून 8 लाख 99 हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते. त्यानंतर 2020-21 मध्ये राज्यात 1 हजार 63 हजार लाख मेट्रीक टन गाळप आणि 1 हजार 63 लाख क्विंटली साखरचे उत्पादन झाले. राज्यात दहा वर्षात साखरेचे 300 लाख मेट्रीक गाळप आणि जवळपास 200 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन वाढले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com