शेतकरी कर्जमाफीस पात्र असूनही वंचित राहिलेल्यांना कर्जमाफी द्या - गणेश दिघे

शेतकरी कर्जमाफीस पात्र असूनही वंचित राहिलेल्यांना कर्जमाफी द्या - गणेश दिघे

तळेगाव दिघे (वार्ताहर) -

शेतकरी कर्जमाफीस पात्र असूनही कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना शासनाने लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी, अशी मागणी तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे सदस्य गणेश दिघे यांनी केली आहे.

दिघे यांनी निवेदनात म्हटले की, महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व थकीत कर्जदार शेतकर्‍यांची कर्ज माफी करण्याची घोषणा केली होती. सत्तेत आल्यावर पहिलाच कर्जमाफीचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही केली. तत्कालीन सरकारनेही कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना फसवी निघाली.

या शेतकरी कर्जमाफी योजनेचे आमिष दाखवून शेतकर्‍यांची घोर निराशा केली होती. परंतु आता सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून शेतकर्‍यांना फार मोठा दिलासा दिला व आपली वचनपूर्ती केली. महाराष्टातील कर्जबाजारी शेतकरी नेहमीच ओल्या व कोरड्या दुष्काळी परिस्थितीने हैराण झालेला होता. हैराण झालेला शेतकरी आत्महत्या करत होता. शेतकरी आत्महत्या हा मोठा प्रश्‍न त्या सरकारच्या काळात नेहमीच सुरु होता. अनेक चुकीच्या कृषीविषयक धोरण व फसव्या योजना यामुळे कृषी क्षेत्रात शेतकर्‍यांना फार मोठे नुकसान सोसावे लागले. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला.

परंतु अखेर महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची व्यथा समजून घेत व पोशिंदा जगला तरच देश जगेल या भावनेने कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले. अगदी सोप्या पद्धतीने संबंधित संस्थांना आदेश देऊन शेतकरी वर्गाला कोणताही नाहक त्रास होणार नाही याची दखल घेत पात्र शेतकर्‍याच्या खात्यात रक्कम जमा केली. काही पात्र शेतकरी मात्र यातून वंचित राहिले. अशा शेतकर्‍यांची यादी शासनाने पुन्हा मागितली. संबंधित संस्थानी पूर्तता करून सदर याद्या सुपूर्द केलेल्या आहेत. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर या याद्या शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. तरी सध्याच्या परिस्थितीत पुढील पिकासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी अडचणी येत आहेत. तरी पात्र शेतकर्‍यांना शासनाने लवकरात लवकर कर्जमाफी देवून कर्जातून मुक्त करावे, अशी मागणीही तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे सदस्य गणेश दिघे यांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com