चहा विक्रेत्याच्या मुलीने राज्यात पटकावला तृतीय क्रमांक

पोलीस उपनिरीक्षकपदी झाली निवड
चहा विक्रेत्याच्या मुलीने राज्यात पटकावला तृतीय क्रमांक

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

चहा विक्रेत्याची मुलगी गिता काकासाहेब मुळे (Gita Kakasaheb Mule) हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा (MPSC) परिक्षेत राज्यात तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण (Passed Third in the State) होत पोलीस उपनिरीक्षकपदी (Sub-Inspector of Police) निवड झाली. तिच्या निवडीने एक नवा इतिहास घडला. तिच्या गावी गळनिंब (Galnimb) येथे तिची वाजतगाजत मिरवणूक काढून ग्रामस्थांनी सत्कार केला.

कु. गिता मुळे हिचे नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) गळनिंब (Galnimb) हे जन्मगाव. गिताचे वडील काकासाहेब मुळे हे गावात छोटंसं चहाच हॉटेल (Tea Hotel) चालवून कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात तर आई विमल या लोकांच्या शेतात मजुरी करते. गुंठाभरही शेती नसताना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण असतानाही मुलांना चांगलं शिकवायचं स्वप्न उराशी बाळगून आणि ते सत्यात उतरवण्यासाठी जिगर लागते आणि ती जिगर मुलींना शिक्षण देताना तर मोठी धमक लागते. ती जिगर एका खेड्यातील दाम्पत्याने आपल्या मुलीच्या बाबतीत दाखवून व मुलीनेही आईवडलांचा विश्वास सार्थ ठरवत नवा इतिहास घडवला आहे.

गिता हिने अतिशय प्रतिकुल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. पहिली ते सातवी प्राथमिक शाळेत तर आठवी ते दहावी गावातच न्यू इंग्लिश स्कुलमध्ये (New English School) झाले आहे. तर गुरुदास भास्करगिरी उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी-बारावी पर्यंत शिक्षण घेत पुढील शिक्षण तिचे बोरावके उच्च माध्यमिक श्रीरामपूर येथे झाले आहे. पद्व्युत्तर शिक्षण तिचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे (Savitribai Phule University Pune) येथे झाले आहे. बोरावके महाविद्यलयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या योजनेतून शिक्षण पूर्ण करण्यास मदत झाल्याच गिता सांगते. तेथे तिला आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार मिळाला तर 2017 साली तिला आदर्श युवती हा पुरस्कार मिळाला होता.

तिला शिक्षण घेत असताना स्कॉलरशिपचाही मोठा फायदा झाल्याचे ती सांगते. स्पर्धा परिक्षेसाठी तिला किशोर सुलाने, शिक्षक सोपान गोरे, बजरंग ओझरकर व सुमन ओझरकर यांचे मार्गदर्श न लाभले आहे.

गिता हिने कुटुंबाला हातभार लावता यावा व आपल्या शिक्षणात खंड पडू म्हणून सुट्टीच्या काळात गावात आईबरोबर लोकांच्या शेतात काम केले असल्याचे वडील काकासाहेब यांनी सांगितले. जर आपल्यामध्ये इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीच अशक्य नाही हे या कुटुंबांने दाखवून देत नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे .

तीन गावांतून मिरवणूक व सन्मान

गिता हिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याचे समजताच गावातील प्रतिष्ठीत तसेच तरूणांनी वाजतगाजत सलाबतपूर-गोगलगाव-गळनिंब अशी मिरवणूक काढत जंगी सत्कार केला. तसेच आपल्या परिसराचे भूषण म्हणून अनेक ठिकाणी तिचा सन्मान करण्यात आला.

लेकराचे पाय पाळण्यात दिसतात तसे गिताच्या बाबतीत घडलं आहे. गिता लहानपणापासूनच खुप हुशार होती. त्यामुळे ती शिकून आपलं स्वप्न साकार करणार असं वाटायचं आणि ते आज खरं झालं. त्यामुळे मला माझ्या मुलीचा खुप अभिमान वाटत आहे.

- काकासाहेब मुळे गिताचे वडील

माझ्यावर माझ्या आई-वडिलांनी विश्वास दाखवला मला शिकवले व आता मला जनसेवा करण्याचे भाग्य लाभले. हे माझ्या आई-वडीलांमुळे शक्य झाले त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद देते.

- गिता मुळे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com