शाळेतील मुलींचे दागिने चोरताना दोन महिलांना पकडले

44 हजारांचे दागिने हस्तगत || सावेडीतील दोन शाळेत घडला प्रकार
शाळेतील मुलींचे दागिने चोरताना दोन महिलांना पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शाळेतील अल्पवयीन मुलींच्या कानातील व नाकातील सोन्याचे दागिने चोरणार्‍या दोन महिलांना शाळेतील शिक्षकांनी रंगेहाथ पकडले. या महिलांनी सुरूवातीला आठरे पाटील पब्लिक स्कूल, सावेडी व नंतर सेंट सेव्हीअर प्रायमरी स्कूल या दोन शाळेतील आठ मुलीचे सोन्याचे दागिने चोरल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुलीचे पालक लॉरेन्स जेम्स गायकवाड (वय 35 रा. मिस्कीन मळा, सावेडी) व आठरे पाटील पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ बाजीराव भोर (वय 55) यांनी फिर्यादी दिल्या आहेत.

वैष्णवी शुभम बडे (रा. भगवान बाबा चौक, निर्मलनगर, सावेडी) व वनिता राजेंद्र शिनगारे (रा. लक्ष्मीनगर, भिंगार) अशा पकडलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 43 हजार 500 रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी एक महिला आठरे पाटील पब्लिक स्कूलमधील चार मुलींना घेऊन बाथरूममध्ये घेऊन गेली. ‘मी तुमची नवीन टिचर आहे, तुमच्या कानातील व नाकातील दागिने माझ्याकडे काढून द्या, मी ते तुमच्या मुख्याध्यापिकांकडे देते, शाळा सुटल्यानंतर त्या तुम्हाला देतील’, असे म्हणून सदरच्या महिलेने चार मुलींच्या कानातील व नाकातील सोन्याचे दागिने काढून घेतले.

दरम्यान काल गुरूवारी (23 फेब्रुवारी) सकाळी सेंट सेव्हीअर प्रायमरी स्कूलमध्ये चार मुलींच्या कानातील रिंगा चोरताना दोन महिलांना शाळेतील शिक्षकांनी पकडले. याची माहिती त्यांनी तोफखाना पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. मुलींसह शाळेचे शिक्षक, पालक पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. पकडलेल्या महिलांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे 43 हजार 500 रुपये किमतीचे दागिने काढून दिले आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com