मुलींच्या छेडप्रकरणी कारवाईसाठी तिसगावमध्ये बंद

विद्यार्थिनींना भर रस्त्यावर छेडले || तरुणांचा मूक मोर्चा
मुलींच्या छेडप्रकरणी कारवाईसाठी तिसगावमध्ये बंद

तिसगाव |वार्ताहर| Tisgav

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शिक्षणासाठी बाहेरून येणार्‍या विद्यार्थिनीची रविवारी भर रस्त्यावर आडवे होऊन, त्यांच्याशी झटापट करत एका तरुणाने छेड काढली. या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी छेड काढणार्‍या तिसगावमधील तरुणावर कठोर कारवाई व्हावी, शालेय विद्यार्थिनींचा रस्ता आडवून गैरप्रकार करणार्‍या गावातील टवाळखोर तरुणांचा बंदोबस्त व्हावा, या मागणीसाठी तरुणांनी सोमवारी एकत्र गाव बंदची हाक दिली. त्यानंतर मूक मोर्चा काढून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी, हनुमान टाकळी येथील दोन विद्यार्थिनी रविवारी शैक्षणिक कामासाठी तिसगाव येथे आल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या पुन्हा गावाकडे जात असताना तिसगाव येथील भर रस्त्यावर गावातील एक तरुण या मुलींना आडवा होत, त्यांच्या झटापट करत त्यांची छेड काढली. यावेळी मुलींनी बचावासाठी आरडाओरड केली. त्यानंतर या मुलींनी कशीबशी या तरुणाच्या हातून सुटका करून घेत तेथून पळ काढला.

या घटनेची माहिती हनुमान टाकळी येथील ग्रामस्थांना समजताच ते तिसगावमध्ये आल्यानंतर तिसगावमधील वातावरण तणावपूर्ण बनले. पोलीसही तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आरोपीला पकडून अटक केली. त्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, तिसगाव येथे शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या मुलींचा तिसगाव मधील टवाळखोर तरुण पाठलाग करून त्यांची छेड काढतात. वृद्धेश्वर चौकात काही तरुण शाळा सुटण्याची वाट पाहतात. शाळा सुटल्यानंतर या मुलींचा मोटरसायकलवरून पाठलाग करत जबरदस्ती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा फोन नंबर मागतात, अशा अनेक घटना सातत्याने घडत असल्याने या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी तिसगावसह परिसरातील विविध गावचे तरुण एकत्र आले व त्यांनी तिसगाव बंदचे आवाहन करत वृद्धेश्वर चौक ते बस स्थानक चौकापर्यंत मूक मोर्चा काढून संबंधित आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

तसेच विद्यार्थिनींना त्रास देणार्‍या टवाळखोरांवर वॉच ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. आंदोलनात पुरुषोत्तम आठरे, सुनील परदेशी, देवा पवार, अकील लवांडे, अमोल वाबळे, सरपंच इलियास शेख, बिस्मिल्ला पठाण, सरपंच महेश लवांडे, पवन परदेशी, अनिरुद्ध जाधव, आकाश उगले यांच्यासह तिसगाव परिसरातील विविध गावचे तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणा मोर्चातील तरुणांकडून देण्यात आल्याने तिसगाव दुमदुमून गेले.

आरोपीवर पॉस्को अंतर्गत कारवाई

मुलींची छेड काढणारा तरुण रफिक पठाण उर्फ लाल्या यास अटक करून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच तिसगाव येथे शालेय विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रयत्न यापुढे कोणी केल्यास पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहेत. शाळा सुटल्यानंतर पोलिसांचा टवाळखोर तरुणांवर वॉच राहणार असून यापुढे कोणाचीही पोलीस प्रशासनाकडून सुट्टी होणार नाही, असा इशारा या मूक मोर्चाला समोरे जाताना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com