
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राधाबाई काळे महाविद्यालयाकडे जाणार्या रोडवर मुलींची छेड काढणार्याला भरोसा सेलच्या निर्भया पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. फरहान शौकतअली शेख (वय 36 रा. आलमगीर, भिंगार) असे त्याचे नाव आहे.
22 मे रोजी भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी यांना राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी फोन करून एक इसम विद्यालयात येणाच्या रस्त्यावर उभा राहुन विद्यार्थिनींची छेड काढून त्यांना त्रास देत आहे, असे कळविले. त्यानंतर प्रभारी अधिकारी भरोसा सेल व निर्भया पथकातील कर्मचारी यांनी राधाबाई काळे महिला महाविद्यालयात जावून तेथील विद्यार्थिनींची भेट घेवुन त्यांच्याशी चर्चा केली.
निर्भया पथक व भरोसा सेलचा संपर्क नंबर देवुन काही तक्रार असेल तर संपर्क करण्याचे आवाहन केले होते. 24 मे रोजी भरोस सेलच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख व निर्भया पथकातील अंमलदार बी. बी. पोकळे, एस. व्ही. कोळेकर, के. एस. खेडकर यांनी तारकपुर बस स्थानक परिसरात सापळा लावला. संशयीत इसम येताच विद्यार्थिनींनी निर्भया पथकाला संपर्क केला.
पथकाने त्या संशयीत इसमाला पकडले. त्याने त्याचे नाव फरहान शौकतअली शेख असे सांगितले. त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.